Panvel Crime | लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा खून; मृतदेह जाळून पुरावा नष्ट करणारा प्रियकर अटकेत

पनवेल तालुका पोलिसांकडून तांत्रिक तपासातून खळबळजनक हत्याकांडाचा उलगडा
Panvel Woman Death Case
प्रेयसीचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली Pudhari
Published on
Updated on

Panvel Woman Death Case

पनवेल : लग्नासाठी सतत तगादा लावणाऱ्या प्रेयसीची लोखंडी रॉडने डोक्यात वार करून निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळखही पटत नसताना तांत्रिक तपास आणि कौशल्यपूर्ण चौकशीच्या आधारे पोलिसांनी या खळबळजनक खुनाचा उलगडा केला.

११ एप्रिल २०२६ रोजी चिंचवली-वाकडी गावांच्या हद्दीतील वनविभागाच्या जागेतील झुडपांमध्ये एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. मृतदेह पूर्णपणे जळालेला असल्याने महिलेची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Panvel Woman Death Case
Panvel Crime : शाळेतील 'गुड टच-बॅड टच'च्या धड्यामुळे नराधमाचे कृत्य उघड; कामोठ्यात तिन चिमुरड्यांची छेड काढणाऱ्या नराधमाला अटक

तपासादरम्यान पोलिसांनी मृत महिलेच्या अंगावरील दागिन्यांच्या आधारे शोधपत्रिका तयार करून राज्यासह देशभर पाठविल्या. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, स्थानिक गावांमध्ये चौकशी तसेच बेपत्ता महिलांच्या नोंदींची पडताळणी करण्यात आली. मात्र, सुरुवातीच्या तपासात कोणताही ठोस धागादोरा हाती लागत नव्हता.

दरम्यान, पोलीस हवालदार सुनील कुदळे यांनी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अनितादेवी भगवान राजभर (वय ३०) या बेपत्ता महिलेची माहिती मिळवली. तिच्या अंगावरील दागिने, हातातील धागा आणि शारीरिक बांधा हा सापडलेल्या मृतदेहाशी जुळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Panvel Woman Death Case
Panvel Crime | फुकट बिर्याणी न दिल्याने विक्रेत्यावर हल्ला; कामोठ्यात धक्कादायक घटना

त्यानंतर अनितादेवीच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेतली असता करण नामदेव पाटील (वय २७, रा. फडकेपाडा, शिळफाटा, ठाणे) हा तिच्या सतत संपर्कात असल्याचे उघड झाले. पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे आणि पोलीस निरीक्षक आनंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक शेळके, हर्षल राजपूत तसेच पोलीस अंमलदार सुनील कुदळे, आकाश भगत, शिवाजी बाबर, सतीश तांडेल आणि विजय देवरे यांच्या पथकाने तपासाची सूत्रे वेगाने हलवली.

करण पाटील याला चौकशीसाठी बोलावूनही तो हजर राहत नसल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. तांत्रिक तपासातून त्याचे आणि मृत महिलेचे सातत्याने संपर्क असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

कसून चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. अनितादेवी ही त्याच्याकडे वारंवार लग्नासाठी आग्रह धरत होती. तिच्यापासून कायमची सुटका करून घेण्याच्या उद्देशाने आरोपीने ६ एप्रिल रोजी तिला कारमधून निर्जन ठिकाणी नेले. तेथे लोखंडी रॉडने तिच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह कारमधून चिंचवली परिसरात आणून कारमधील पेट्रोल काढून मृतदेहावर टाकले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तो जाळून टाकल्याची कबुली त्याने दिली.

Panvel Woman Death Case
Panvel Crime: पनवेलमध्ये धावत्या ट्रेनमधून तरुणीला बाहेर फेकले, माथेफिरूला अटक; तरुणीच्या प्रकृतीबाबत अपडेट समोर

या प्रकरणी करण नामदेव पाटील याला ८ जून रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोणताही ठोस पुरावा नसताना आणि मृत महिलेची ओळखही अज्ञात असताना पनवेल तालुका पोलिसांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे अखेर या थरारक हत्याकांडाचे गूढ उलगडण्यात यश आले असून, पोलिसांच्या तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news