Nagpur Deekshabhoomi Management Dispute
नागपूर : स्मारक समिती, दीक्षाभूमी संदर्भात खोटी आणि दीशाभूल करणारी माहिती सार्वजनिकरित्या सांगणारे समितीचे डॉ. राजेंद्र गवई आणि विलास गजघाटे यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी प्रसिध्दी पत्रकामार्फत प्रसार माध्यमांना दिली. तसेच दीक्षाभूमीचे व्यवस्थापन बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्याचा केविलवाना प्रयत्न असल्याची टीका ससाई यांनी केली.
ससाई पुढे म्हणाले त्यांच्या या कृतीमुळे समाजात चुकीचा संदेश पसरला असून धम्म बांधवात रोष निर्माण होत आहे. खोट्या माहितीमुळे केवळ दीक्षाभूमीचीच नव्हे तर समाजाचीही बदनामी होत आहे. याकडेही ससाई यांनी लक्ष वेधले.
धर्मादाय आयुक्त कार्यालयातील नोंदींमध्ये डॉ. राजेंद्र गवई यांचे नाव सचिव म्हणून कुठेही नोंदलेले नाही. धर्मदाय उपायुक्त यांच्या आदेशानुसार कार्यालयात नोंद असलेल्या सदस्यांनाच समितीचे व्यवस्थापन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
असे असताना, डॉ. राजेंद्र गवई हे उपधर्मादाय आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करून तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकृत अभिलेखांच्या विरुद्ध स्वतःला सचिव म्हणून भासवित आहेत. त्यांच्या अशा बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. तसेच विलास गजघाटे यांच्या बेकायदेशीर कृत्यांविरुद्धही सक्षम न्यायालयासमोर आवश्यक कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे.
डॉ. राजेंद्र गवई हे विलास गजघाटे यांच्या संगनमताने न्यासाचे व्यवस्थापन बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तसेच विलास गजघाटे यांची न्यासाचे अध्यक्ष म्हणून झालेली प्रसिद्धी पूर्णपणे चुकीची, वस्तुस्थितीविरुद्ध आणि दिशाभूल करणारी आहे. त्यांची न्यासाचे अध्यक्ष म्हणून कोणतीही नियुक्ती झालेली नाही असे ससाई यांनी स्पष्ट केले.