नागपूर : भाऊ आपले साडेपाच हजार रुपये परत का देत नाही, यातून झालेल्या वादाचे पर्यवसान भावाच्या हत्येत झाल्याने कौटुंबिक भावनिक संबंधावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या महिन्यात आतापर्यंत ही खुनाची 13 वी घटना असल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मृतकाचे नाव प्रदीप गोविंदराव बाबुळे (वय : ३९, रा. हिवरीनगर झोपडपट्टी) असे आहे. या दोघांचीही यापूर्वी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. दोघेही फर्निचर कामगार म्हणून काम करत होते. आरोपीस एक मुलगा व एक मुलगी आहे.
“मी माझ्या भावाचा खून केला आहे” असा आशय नमूद असलेला कॉल पोलिसांना आला होता. नियंत्रण कक्षमार्फत सदर संदेश प्राप्त झाल्यानंतर बीट मार्शल यांनी तात्काळ हिवरीनगर झोपडपट्टी परिसर गाठला. घटनास्थळी आरोपी ज्याने फोन केला तो भगवान गोविंदराव बाबुळे, (वय : ४२ वर्षे, रा. हिवरीनगर झोपडपट्टी) होता. त्याने घटनास्थळी पडून असलेल्या इसमाची ओळख प्रदीप गोविंदराव बाबुळे अशी करून दिली व सदर इसम हा त्याचा सख्खा भाऊ असल्याचे सांगितले.
मृतक प्रदीप गोविंदराव बाबुळे याच्याकडे मजुरीचे सुमारे साडेपाच हजार रुपये होते. सदर रकमेच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्याने त्याच्याकडून स्वतःवरील नियंत्रण सुटले व घटनास्थळी उपलब्ध असलेल्या टॉमीने (लोखंडी साधन) भावास जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये मृतकाचा जागीच मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले.