नागपूर : एका अल्पवयीन मुलीला घरात डांबून मारहाण करीत सिगारेटचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार यशोधरानगर परिसरात उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी १८ वर्षीय युवकासह त्याच्या कुटुबातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नौशाद अली, नियाज अली, त्याची आई शहिस्ता बेगम, वडील नियाज अली, भाऊ शाहरुख अली आणि रुबी परवीन अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. नौशाद फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पीडित मुलीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
पीडित मुलगी आठवीत शिकते. नौशादने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. जानेवारी महिन्यात त्याने तिला भेटायला बोलावून सोबत नेले. काही दिवसांनी तिला सोडण्यात आले. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानतर मुलाला कळमेश्वर येथील बालनिरीक्षणगृहात ठेवण्यात आले होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुलीच्या भावाला त्याच्या मित्राने फोन करून नौशाद चटके देत होता आणि घरात डांबून ठेवत होता, असे सांगितले. ही मुलगी यशोधरानगर परिसरात नौशादकडे असल्याची माहिती दिली. भावाने घरी जाऊन आजीला विचारणा केली. त्यावेळी आजीने मुलीला बालगृहातून आणल्याचे सांगितले. मात्र, ती आरडाओरड करीत असल्याने तिला कडबी चौकात उतरविल्याचेही तिने सांगितल्याची माहिती तक्रारीत नमूद त्याच्या आहे. यानंतर मुलीचा भाऊ नौशादच्या घरी गेला. पीडितेच्या भावाने तिची सुटका करून यशोधरानगर पोलिस ठाण्यात आरोपीच्या नातेवाइकांविरुद्ध तक्रार दिली.