नागपूर - सहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीचे अपहरण करून लॉजवर दोघांनी आळीपाळीने बलात्कार केल्याने जिल्ह्यातील हॉटेल्स आणि लॉजवर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात सातत्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न राज्यात एरणीवर आहे. नागपुरातील नंदनवन परिसरातील ही घटना असून कुख्यात गुंडाने आपल्या साथीदाराच्या मदतीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.
नंदनवन मधील या घटनेत आरोपींनी बिडगाव येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि हा व्हिडीओ देखील तयार केला. यानंतर तिला दुचाकीने पुन्हा घराजवळ आणून सोडले. कुणाकडे काही सांगितल्यास हा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तिला दिली. मात्र, प्रकृती बरी नसल्याने तिने आईला सर्व घटनाक्रम सांगितला. अखेर आईने मुलीसोबत नंदनवन पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणी करन कवडू रामटेके, रोहित सोनवाने चंद्रानगर प्रजापति नगर या दोन आरोपींना अटक केली असून न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी करण रामटेके याच्यावर चोरी, मारहाण आणि दंगल संदर्भातील गुन्हे दाखल असून दुसरा आरोपी रोहित याच्यावर देखील आधीपासूनच पोस्को संदर्भातील गुन्हे दाखल आहेत. एकंदरीत गुंड प्रवृत्तीच्या या दोघांच्या बेधडक कृत्याने शहर व जिल्ह्यात हॉटेल्स, लॉजच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अल्पवयीन मुलीला घेऊन कुणी आलेले असताना त्यांची आयडी, वयाचा दाखला आदी चौकशी का झाली नाही यावरून हॉटेल्सच्या व्यवस्थापनाचे देखील या प्रकारच्या घटनांमध्ये साटेलोटे असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीही विविध हॉटेल्समध्ये अशा घटना घडल्याने आता पोलिस काय कडक कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.