Crime News  Pudhari
नागपूर

Nagpur crime: हुडकेश्वरमध्ये लूटमारीचा बनाव उघड; २ लाखांची देणी टाळण्यासाठी रचला होता डाव

२ लाखांची देणी टाळण्यासाठी लूटमारीचा बनाव; हुडकेश्वर पोलिसांनी उघडकीस आणला

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : पैसे परत करण्याची वेळ आल्याने आर्थिक जबाबदारी टाळण्यासाठी स्वतःच्याच कारमधील दोन लाख रुपयांची रोकड लुटल्याचा बनाव करणाऱ्या तरुणाचा हुडकेश्वर पोलिसांनी पर्दाफाश केला. तक्रारदाराच्या कथनातील विसंगती, मोबाईल लोकेशन आणि उपलब्ध इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर लूटमारीची घटना बनावट असल्याचे समोर आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी अमोल संतोष धर्नेजा (वय २८, रा. त्रिमूर्तीनगर, नागपूर) हा हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आला. पिरॅमिड सिटी परिसरातून जात असताना एका अनोळखी व्यक्तीने लिफ्ट मागितली. त्याला कारमध्ये बसवल्यानंतर काही अंतरावर त्या व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून मारहाण केली आणि कार घेऊन पळ काढला, अशी तक्रार त्याने दिली.

कारमध्ये सुमारे २ लाख ५ हजार रुपये रोख असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. काही वेळाने ही कार सोनेगाव-विमानतळ परिसरात आढळून आली. मात्र कारमधील मोबाईल व इतर साहित्य जसेच्या तसे होते, केवळ रोख रक्कम गायब असल्याचे तक्रारदाराने सांगितले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हुडकेश्वर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान तक्रारदाराच्या कथनात अनेक विसंगती आढळून आल्या. घटनेपूर्वीच्या हालचालींबाबत त्याने वेगवेगळी माहिती दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी तक्रारदाराचा मोबाईल, लोकेशन आणि उपलब्ध इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची सखोल पडताळणी केली.

चौकशीत अखेर लूटमारीची संपूर्ण घटना बनावट असल्याचे समोर आले. पोलिसांच्या माहितीनुसार, अमोल धर्नेजाने त्रिमूर्तीनगर परिसरात ‘बैठक कॅफे’ सुरू करण्यासाठी त्याचा मित्र अवतारसिंग महेन्द्रसिंग धुन्ना (वय ४२, रा. आंबेडकर चौक, लकडगंज, नागपूर) याच्याकडून सुमारे दोन लाख रुपये घेतले होते. ही रक्कम परत करण्यासाठी त्याच्याकडे सातत्याने पैशांची मागणी होत होती. २२ ऑगस्ट रोजी पैसे परत करण्याची वेळ आली असताना त्याच्याकडे रक्कम उपलब्ध नव्हती. त्यामुळे आपण दिलेले पैसे लूटमारीत गेले असल्याचा बनाव केल्यास पैसे परत करण्याची वेळ टाळता येईल, असा विचार करून त्याने खोटी लूटमारीची घटना रचल्याचे तपासात निष्पन्न झाले.

ही कारवाई हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापूरे यांच्या नेतृत्वाखाली API रामटेके, HC मुकेश किन्नाके आणि PC रिषभ ठाकरे यांनी केली. ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, पोलीस सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त ऋषिकेश सिंगारेड्डी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT