नागपूर : राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने पोलिसांना दमदाटी करणाऱ्या तिघांवर मंगळवारी (दि.५) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराची गंभीर दखल घेत स्वतः पालकमंत्री बावनकुळे यांनी या आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या घटनेबाबत पालकमंत्री बावनकुळे यांच्या कार्यालयाने रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर जुनी कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत अधिक माहिती अशी, फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने रविवारी (दि.३) जिल्ह्यातील कामठी मार्गावरील ईडन ग्रीन्स लॉन येथे काही लोकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. मात्र, याठिकाणी पोलिसांनी परवानगी देताना आखून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करण्यात आले नाही. पोलिस याठिकाणी कार्यवाईसाठी गेले असता आरोपी वेदांत छाबरिया (रा. नागपूर, रितेश चंद्रशेखर भदाडे, रा. वाडी), आकाश बनमाली सालम यांनी पोलिसांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने दमदाटी केली. या घटनेचा व्हिडिओ सोमवारी (दि.४) सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा प्रकार पालकमंत्री बावनकुळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी बोलून सबंधित संशयितांवर कठोर कारवाईचे आदेश दिले. या घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्री बावनकुळे यांच्या कार्यालयाने जुनी कामठी पोलीस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.