नागपूर, पुढारी वृत्तसेवा : हल्ली कुणाला आपलेसे करण्याची धडपड, झटपट श्रीमंती किंवा आपले शौक पूर्ण करण्यासाठी कोण काय करेल, याचा नेम राहिलेला नाही. प्रेयसीला महागडा आयफोन भेट देण्यासाठी दोन भावंडांनी चक्क घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. (Nagpur Crime News)
या दोघांनाही गांजा व दारूचे देखील व्यसन असून यापूर्वीचेच त्यांच्यावर चोरीचे आठ गुन्हे दाखल आहेत. आता या दोघांचीही कळमना पोलिसांनी बालसुधार गृहात रवानगी केली आहे. या दोन्ही सख्ख्या भावांचे वय सतरा व सोळा वर्षे असून कामनानगर येथील या घटनेत त्यांनी दिघेश्वर किसनलाल रहांगडाले (वय 36) यांच्याकडे घरफोडी करून दीड लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. (Nagpur Crime News)
कळमना पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय बारकाईने या प्रकरणाचा तपास करीत सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत प्रेयसीला महागडा फोन हवा असल्याने आपण ही घरफोडी केल्याची 17 वर्षीय मुलाने कबुली दिली. यात आपल्याला लहान भावाने देखील साथ दिल्याचे सांगितले. कळमना पोलिसांनी ही कारवाई केली.