Nagpur Bank Robbery Video: नागपुरातून बँक लुटीची धक्कादायक घटना समोर आली आहे. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील SBI बँकेच्या शाखेत एका आरोपीने कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून तब्बल 4 लाख 53 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग लुटली. या घटनेचे CCTV फुटेजही समोर आले असून, त्यामध्ये आरोपी बँकेत शिरून कर्मचाऱ्यांवर मिरची पूड फेकताना दिसत आहे.
ही घटना गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. बँकेचे कामकाज संपल्यानंतर सूरज बोरकर नावाचा आरोपी चेहऱ्यावर कापड बांधून बँकेच्या शाखेत शिरला. त्याने अचानक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली.
याच गोंधळाचा फायदा घेत आरोपीने कर्मचाऱ्यांच्या हातातील 4 लाख 53 हजार रुपये रोकड असलेली बॅग हिसकावली आणि तेथून पळ काढला.
आरोपी बँकेतून बाहेर पडताच कर्मचाऱ्यांनी आरडाओरड करत त्याचा पाठलाग केला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत बँकेपासून काही अंतरावरच आरोपीला पकडले.
पोलिसांनी आरोपीकडून लुटलेली 4 लाख 53 हजार रुपयांची संपूर्ण रोकड जप्त केली. त्यामुळे बँकेचे मोठे आर्थिक नुकसान टळले.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने बँकेची आधीच रेकी केली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बँकेतील कर्मचारी ATMमध्ये पैसे कधी जमा करतात, याची माहिती आरोपीने मिळवली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानुसार त्याने बँकेजवळच दबा धरून योग्य संधीची वाट पाहिली असण्याची शक्यता आहे.
या धक्कादायक घटनेचे CCTV फुटेज समोर आले आहे. फुटेजमध्ये आरोपी चेहऱ्यावर कापड बांधून बँकेच्या परिसरात प्रवेश करताना दिसतो. त्यानंतर तो बॅगेतून मिरची पूड काढतो आणि थेट बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकतो.
मिरची पूड डोळ्यात गेल्याने कर्मचारी सैरावैरा धावू लागतात. काही क्षणांतच बँकेत गोंधळाचे वातावरण निर्माण होते. त्यानंतर कर्मचारी आरोपीचा पाठलाग करतात. मात्र, आरोपी काही अंतर पळून जाण्यात यशस्वी होतो. त्यानंतर पोलिस काही मिनिटांतच त्याला रोकडेसह ताब्यात घेतात.
या प्रकरणाचा पुढील तपास सक्करदरा पोलीस करत असून, आरोपीने बँकेची रेकी कशी केली आणि या लुटीमागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे.