Baidyanath Chowk Shree Om Decor Fire
नागपूर : बैद्यनाथ चौक परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ‘श्री ओम डेकोर’च्या दुकानाला सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. दुकानात सजावटीसाठी ठेवण्यात आलेल्या लाकडी पॅनेलने पेट घेतल्याने काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दुकानाचे मालक सतीश टावरी यांच्या शेजारील दुकानातील नागरिकांच्या निदर्शनास आग आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता दुकानात बांधकामासाठी ठेवण्यात आलेल्या लाकडी पॅनेलला मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे दिसून आले.
लाकडी साहित्यामुळे आगीने काही वेळातच मोठे रूप धारण केले. घटनेची माहिती सकाळी ११.२८ वाजता अग्निशमन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच कॉटन मार्केट अग्निशमन केंद्राच्या दोन गाड्या अवघ्या दोन मिनिटांत, ११.३० वाजता घटनास्थळी दाखल झाल्या.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवण्याचे काम सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. अग्निशमन दलाने वेळीच कारवाई केल्याने आग शेजारील दुकानांपर्यंत पसरण्याचा धोका टळला.
प्राथमिक माहितीनुसार, सजावटीसाठी लावलेल्या फलकातील विद्युत ठिणगी अथवा विद्युत बिघाडामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आगीमध्ये दुकानातील सजावटीचे साहित्य आणि इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती आहे. नुकसानीचा नेमका आकडा तपासानंतर स्पष्ट होणार आहे. घटना घडताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.