नागपूर : राज्यातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने महिला व बालविकास विभागाने ‘स्मार्ट अंगणवाडी कीट’ खरेदीस मान्यता दिली आहे. या निर्णयाचा सर्वाधिक लाभ पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्हा आणि कामठी मतदारसंघातील अंगणवाड्यांना होणार आहे. या निर्णयामुळे नागपूर शहर, कामठी आणि परिसरातील शेकडो अंगणवाड्या आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि मुलांसाठी आकर्षक स्वरूपात विकसित होणार आहेत. ‘स्मार्ट अंगणवाडी कीट’मध्ये शिक्षण आणि खेळ यांचा समन्वय साधणारी आधुनिक साधनसामग्री, स्मार्ट स्क्रीन, डिजिटल लर्निंग टूल्स, बाल आरोग्य तपासणी उपकरणे, पोषणविषयक चार्ट्स तसेच बालविकास कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण मार्गदर्शिका यांचा समावेश आहे.
महिला व बालविकास विभागाने २८ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार राज्यभरातील ५,४६९ अंगणवाडी केंद्रांसाठी स्मार्ट अंगणवाडी कीट खरेदीस मान्यता देण्यात आली आहे. प्रत्येक कीटची किंमत १,६४,५६० रूपये असून एकूण रूपये ८९,९९,७८,६४०/- इतक्या निधीच्या खरेदीस शासन मान्यता देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे लहान बालकांना खेळता-खेळता शिकण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या आरोग्य, पोषण आणि बौद्धिक विकासात मोठी सुधारणा होईल. नागपूर आणि कामठी परिसरातील अंगणवाड्यांना ‘स्मार्ट क्लासरूम’चे स्वरूप मिळणार असून, सुमारे दहा हजारांहून अधिक बालकांना दर्जेदार शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा उपलब्ध होतील.या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर आणि कामठी परिसरातील केंद्रांना स्मार्ट अंगणवाडी कीट वितरित करण्यात येणार असून, स्थानिक प्रशासन व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत ही प्रक्रिया राबविण्यात येईल.