अजनी पोलिसांनी शताब्दी चौक ते ओंकारनगर मार्गावर संशयावरून एका व्यक्तीला ताब्यात घेतले  Pudhari
नागपूर

Nagpur MD Drug Seized | नागपुरात एमडी जप्त; ओडिशातील आरोपी ताब्यात, दोघे फरार

अजनी पोलिसांची कारवाई; ११.१६ ग्रॅम एमडी, मोबाईल व रोकड जप्त

पुढारी वृत्तसेवा

Odisha Drug Smuggler

नागपूर : उपराजधानी नागपुरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. अजनी पोलिसांनी शताब्दी चौक ते ओंकारनगर मार्गावर संशयावरून एका व्यक्तीला ताब्यात घेत त्याच्याकडून ११.१६ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्त केले. या कारवाईत मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ४४ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शताब्दी चौकाकडून ओंकारनगरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी रात्री सुमारे १० वाजता पोलिसांनी संशयावरून अब्दुल शिराज अब्दुल गफार (३८, रा. हलधरपूर, सुखरपाडा, जि. कटक, ओडिशा; सध्या रा. शताब्दी चौक, काशीनगर, नागपूर) याला ताब्यात घेतले.

झडतीदरम्यान त्याच्याकडून ११.१६ ग्रॅम एमडी, मोबाईल फोन आणि १ हजार ५०० रुपये रोख असा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई सुरू केली आहे.

दोन साथीदार फरार

पोलिसांच्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेला अब्दुल हा रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणातील राहुल आणि डेवील (दोघेही रा. चंद्रपूर) हे दोन संशयित साथीदार सध्या फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या कारवाईप्रकरणी पोलीस हवालदार सुशील जानराव बहिरे यांनी फिर्याद दिली असून, अजनी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT