Nagpur actor Priyanshu murder case
नागपूर : झुंड चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या नागपुरातील अभिनेता प्रियांशु उर्फ बाबू छत्री याची अतिशय निर्दयीपणे जरीपटका पोलिस स्टेशनच्या हद्दीत हत्या करण्यात आली आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.
पोलिसांनी या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. वायरने हातपाय बांधून अर्धनग्न आणि अतिशय गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांनी त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, शस्त्राचे अनेक ठिकाणी भीषण घाव, मोठा रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. निर्माता, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आणि महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ' झुंड' चित्रपटात बाबू छत्रीच्या अफलातून भूमिकेने तो सर्वदूर लोकप्रिय ठरला होता.
या हत्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा संशयित ध्रुवकुमार लालबहादूर साहू हा उत्तर नागपुरातील नारा परिसरात राहतो. दुसरीकडे मेकोसाबाग परिसरात राहणारा बाबू छत्री याची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. दोघांवरही चोरी, मारहाण असे अनेक गुन्हे दाखल आहेत. या दोघांचा क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि ध्रुवकुमारने दारूच्या नशेत छत्रीच्या हातापायभोवती वायर गुंडाळून त्याची सपासप शस्त्राचे घाव घालत हत्या केल्याचे बोलले जाते. जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी आले आणि नंतर त्यांनी पोलिसांना पाचारण केले.