Nagpur Migratory Birds  Pudhari
नागपूर

Nagpur Migratory Birds : ३५०० किलोमीटरचा प्रवास करून पाहुण्यांचे नागपुरात आगमन; सोनेगाव आमराईत परदेशी पक्ष्यांचा मुक्काम

सायबेरिया, रशिया आणि मंगोलियातून आलेल्या विदेशी पक्ष्यांनी फुलली आमराई

पुढारी वृत्तसेवा

Sonegaon Amrai Nagpur Migratory Birds

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : येथील दक्षिण-पश्चिम भागात असलेली भोसलेकालीन सोनेगाव आमराई सध्या विदेशी आणि स्थानिक पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजली आहे. गुलाबी थंडीच्या आगमनासोबतच सायबेरिया, रशिया आणि मंगोलियासारख्या अतिथंड प्रदेशांतून हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध प्रजातींचे स्थलांतरित पक्षी या आमराईत दाखल झाले आहेत. तब्बल ३५०० किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या तैगा फ्लायकॅचरसह विविध दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन पक्षी निरीक्षक आणि निसर्गप्रेमींसाठी आकर्षण ठरत आहे. ऐतिहासिक वारसा, हिरवाई आणि जैवविविधतेने समृद्ध असलेली ही आमराई सध्या पक्ष्यांचे हिवाळी आश्रयस्थान बनली आहे.

विदेशी पक्ष्यांसाठी आमराई बनली हक्काची विसावा जागा

सोनेगाव आमराई आणि लगतचा सुमारे ४० एकरांचा विस्तीर्ण जंगल परिसर सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी नागरिकांचे आवडते ठिकाण आहे. वॉकिंग, रनिंग, सायकलिंग आणि योगाभ्यासासाठी येथे नागरिकांची नियमित गर्दी असते. मात्र, सध्या या परिसराचे आणखी एक वैशिष्ट्य समोर आले आहे. हिवाळ्याच्या हंगामात परदेशातून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांनी येथे मुक्काम ठोकला आहे.पक्षी अभ्यासक विशाल अभ्यंकर यांच्या माहितीनुसार, सायबेरिया, रशिया आणि मंगोलियासारख्या अतिथंड प्रदेशांतून अनेक पक्षी नागपुरातील सोनेगाव आमराईत दाखल झाले आहेत.

३५०० किलोमीटरचा प्रवास करून तैगा फ्लायकॅचरचे आगमन

यंदाच्या हिवाळ्यात आमराईत दिसणाऱ्या पक्ष्यांमध्ये Taiga Flycatcher विशेष आकर्षण ठरत आहे. रशिया, सायबेरिया आणि युरोपमधील थंड प्रदेशांतून सुमारे ३५०० किलोमीटरचा प्रवास करून हा छोटासा पक्षी नागपुरात पोहोचला आहे. याशिवाय Blue-capped Rock Thrush अर्थात निळ्या टोपीचा कस्तुर आणि Red-breasted Flycatcher या स्थलांतरित पक्ष्यांचेही दर्शन होत आहे.निळ्या टोपीचा कस्तुर प्रामुख्याने हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडच्या भागात आढळतो. हिवाळ्यात तो दक्षिण भारताच्या दिशेने स्थलांतर करतो. या प्रवासादरम्यान मध्य भारतातील नागपूर आणि सोनेगाव आमराईत काही काळ विसावा घेतो. हिवाळ्यात युरोप, रशिया, सायबेरिया आणि मंगोलियातून येणारे पक्षीही या परिसरात आश्रय घेतात.

स्थानिक पक्ष्यांचीही रंगत; पोपटांची भरते सकाळी शाळा

विदेशी पाहुण्यांसोबतच आमराईत अनेक स्थानिक पक्ष्यांचेही दर्शन घडत आहे. पक्षी अभ्यासक आणि निरीक्षकांनी Grey Hornbill (धनेश), Orange-headed Thrush (नारिंगी डोक्याचा कस्तुर), Asian Paradise Flycatcher (स्वर्गीय नर्तक) आणि Common Hawk Cuckoo (पावश्या) अशा विविध पक्ष्यांची नोंद केली आहे. विशेष म्हणजे, आमराईतील पुरातन बारव अर्थात विहिरीजवळ दररोज सकाळी पोपटांचे थवे एकत्र येतात. त्यामुळे या परिसरात जणू पोपटांची शाळाच भरत असल्याचे मनोहारी दृश्य पाहायला मिळते.

भोसलेकालीन वारसा आणि जैवविविधतेचे जतन करण्याची गरज

सोनेगाव आमराईचे महत्त्व केवळ पक्ष्यांपुरते मर्यादित नाही. या परिसरात भोसलेकालीन मुरलीधर मंदिर, हनुमान मंदिर आणि पुरातन बारव आहे. तसेच वड, कडुनिंब आणि पिंपळ यांसारखे अनेक जुने वृक्ष या परिसराची नैसर्गिक समृद्धी टिकवून आहेत. दरवर्षी हिवाळ्यात विविध प्रजातींचे विदेशी पक्षी या आमराईत येतात आणि काही काळ मुक्काम करतात. त्यामुळे या परिसराचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित होते. या नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारशाचे संरक्षण व संवर्धन करण्याबरोबरच परिसर कचरामुक्त ठेवणे आवश्यक आहे. नागरिकांनीही या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य आणि पक्ष्यांचे अधिवास जपण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन WeLove सोनेगाव आमराई ग्रुपचे प्रवर्तक सचिन द्रवेकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT