नागपूर : देशाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले शहीद फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या वतीने एक कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाथरकर यांच्या हस्ते शहीद जवानाचे वडील रवींद्र नारायण दुरुगकर (वीरपिता) आणि आई श्रीमती संध्या रवींद्र दुरुगकर (वीरमाता) यांना अनुदानाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर हे नागपूर येथील न्यू सुभेदार लेआउट, हुडकेश्वर रोड परिसरातील रहिवासी होते. देशांतर्गत सुरक्षा मोहिमेच्या अनुषंगाने एसयू-३० एमकेआय (SU-30 MKI) विमानाच्या उड्डाणाशी संबंधित युद्धाभ्यासपूर्व प्रशिक्षणाचा सराव सुरू असताना आसाम राज्यातील जोरहाट जिल्ह्यात ५ मार्च २०२६ रोजी झालेल्या विमान अपघातात त्यांना वीरमरण आले.