नागपूर - दादागिरीच्या जोरावर दहशत निर्माण करून आरक्षण मिळत नाही आणि दहशत निर्माण करणारी, सरपंच ते मुख्यमंत्रीपद भूषविणारी जात मागास असू शकत नाही असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. एकंदरीत राज्यात पुन्हा एकदा मराठा ओबीसी संघर्ष अटळ दिसत आहे.
हाके म्हणाले, कितीही दहशत निर्माण केले तरी संविधानाने त्यांना आरक्षण मिळू शकत नाही. बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे यांना ओबीसीतून आरक्षण मिळू शकत नाही. किंबहुना तसे झाले तर देशभरातील ओबीसी संपलेला असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आय माय काढणारे जरांगे पाटील आणि सत्तेत त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे या सगळ्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये चौका चौकात भले मोठे बॅनर उभे केले आहेत. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे आणि दुसरीकडे ही वेगळी भूमिका घ्यायची हे बरोबर नाही. जरांगे पाटील यांना रसद पुरविली जात आहे. ठोसपणे,भक्कमपणे त्यांना पाठिंबा देत आहेत. शरद पवार राष्ट्रवादी गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाची जरांगे पाटलाला आपण कसा पाठिंबा द्यायचा यासाठी चढाओढ लागली आहे असा आरोपही त्यांनी केला. शरद पवार हे सत्तेत एक प्रकारे सामील असल्याचा आरोप आहे. काहीही करा पण ओबीसींचे आरक्षण संपवू नका.असा इशारा दिला.
मुख्यमंत्री यांची आय माय काढली जाते. अजित दादा परखड नेते असताना तुम्ही बोलत नाही. आमदारांना समज देत नाहीत, हे आंदोलन तुम्ही पुरस्कृत करून ओबीसींना संपवण्याचा घाट आहे का? असा सवालही लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला. मटका गावठी दारू, गुन्हेगार यांच्या सर्कलमध्ये जरांगे वाढले असून महाराष्ट्राचा पुरोगामी वारसा पाहता या मोठ्या माणसाचा पाठिंबा घेण्याची वेळ आमच्या मराठा बांधवांवर केव्हा आली असा सवाल केला. ओबीसीमध्ये तुम्ही दहशत निर्माण करतात. मुळात जरांगे हा फुटकळ माणूस आहे ज्याला संविधान माहीत नाही. एकनाथ शिंदे आणि अजित दादा यांना जे करता येत नाही ते यापुढे माणसाच्या माध्यमातून करून घेत आहेत.
जरांगेना मुंबईला जाऊ देणार नाही...
आम्ही ओबीसी आम्ही जरांगेचा गणपती मुंबईत जाऊ देणार नाही. त्याला अलीकडेच विसर्जन करायला लावू. ओबीसींचे गाव आमचे आहे, ओबीसी वाड्या वस्त्या आहे... तो आमची आय काढत असेल, पुतळे जाळत असेल, आमच्याच माणसांना आमच्या अंगावर सोडत असेल, तर आम्ही बांगड्या भरलेल्या नाही आम्हीही रस्त्यावर उतरू असा इशारा हाके यांनी दिला. मला भीती नाही, मी जीव हातात घेऊन फिरत आहे, माझ्या ओबीसीच्या अधिकाराचा रक्षक होत असेल तर मी बळी द्यायला तयार आहे. मला सुरक्षा देणे हे शासनाचं काम आहे. रोज 700 ते 800 किलोमीटर फिरतो. जाहीर सभेत भाषण करतो. धमक्यांना घाबरत नाही. मी लढणाऱ्याची अवलाद आहे असा इशारा दिला. सणासुदीचे दिवस आहेत. जरांगे पाटलाला दुसरे उद्योग नाही. दर दोन-चार महिन्यात उपोषण करायचे, मराठवाड्यातले वातावरण अस्वस्थ करायचे हे बरोबर नाही.