

बीड : आता ही शेवटची लढाई आहे आता मुंबईला गेल्यावर ही आरक्षणाची शेवट फाईट आहे. पण यावेळी आरक्षणाचा गुलाल उधळून यायचा आहे. तोपर्यंत मैदान सोडायचे नाही असा निर्धार मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. बीड येथील मांजरसुंभा येथे झालेल्या सभेवेळी ते बोलत होते. येत्या २७ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथून आंदोलनाच्या पुढील टप्प्याची घोषणा करताना जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या असून, बीड जिल्ह्याला आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे विशेष आवाहन केले आहे.
पुढे त्यांनी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की अंतरवली येथे झालेल्या विराट सभेसाठी दोन करोड लोक आले होते. पण कोणत्याही आंदोलकांनी पोलिसांना त्रास दिला नाही.पण देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून पोलिस मात्र आंदोलकांना त्रास देत आहेत. असा आरोपही त्यांनी केला.
मनोज जरांगे यांनी पुढे सांगितले की देवेंद्र फडणवीस यांचा एक मित्र आला होता माझ्याकडे. मी त्या मित्राजवळ निरोप दिला आहे की फडणवीस यांनी मराठा समाजाच्यास मागण्या मान्य करा. आम्ही मुंबईला येणार नाही. पुढे त्यांनी मुंबईतील आंदोलनाविषयी मार्गदर्शन केले. सर्व लोकांना तिथे राहण्यासाठी पूर्ण तयारी करुनच यावे, ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या सोबत घ्याव्या. अंथरुण पांघरुन, जेवणाचे साहित्य, तसेच पाण्याची सोयही करावी असे आवाहन केले.
कायदा सुव्यवस्थेची काळजी घ्या
पुढे बोलतना मनोज जरांगे यांनी सांगितले की मुंबईतील आंदोलनावेळी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी कोणी दगडफेक, जाळपोळ करायची नाही. २७ ऑगस्ट ला सकाळी दहा वाजता अंतरवली येथून निघायचे आहे. पण आपल्या आंदोलनात कोणीही शिरु शकते. असे समाजकंटक दगडफेक करु शकतात किंवा तुम्हाला उचकवतील त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असे आवाहनही जरांगे यांनी केले. बीड जिल्ह्यातील प्रत्येक घरातील माणसाने आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.
..तर महादेव मुंडे यांचे मारेकरी पकडा
पोलिसांच्या भुमिकेवर बोलताना जरांगे म्हणाले की आंदोलकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना पकडून दाखवा. आम्ही कायदा हातात घेणार नाही, पण पोलिसांना जर आपली ताकद दाखवायची असेल तर त्यांनी निष्पाप मराठा तरुणांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी महादेव मुंडे यांच्या खुनातील आरोपींना पकडावे. असे आवाहनही केले.
मनोज जरांगे पाटील यांनी एकीकडे शांततापूर्ण आंदोलनाची ग्वाही दिली आहे, तर दुसरीकडे प्रशासनाला थेट आव्हान देत आपली भूमिका अधिक आक्रमक केली आहे. त्यांच्या या दुहेरी पवित्र्यामुळे २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.