Nagpur Municipal Corporation Election
नागपूर : राजेंद्र उट्टलवार
एकीकडे राजधानी मुंबईत शिवसेना-भाजपचे जागावाटप ठरले. महायुतीचा किंबहुना भाजपचा महापौर आणण्यासाठी भाजपच मोठा भाऊ असल्याचे उघड झाल्यानंतर उपराजधानी नागपूर येथे भाजप-शिवसेना एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काल रात्री उशिरा झालेल्या चर्चेवरून यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यानुसार आठ जागा शिंदे शिवसेना गटाला दिल्या जाणार आहेत. काल यासंबंधीचे वृत्त पुढारीने दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार आहे. यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देताना भाजपच्या अनेक माजी नगरसेवकांचे तिकीट कापण्यात आल्यामुळे बंडखोरांना उगीच संधी नको, या तत्त्वाने शिवसेनेची कमी जागा देत कोंडी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेत देखील राजीनामा सत्र सुरू झाले आहे.
जिल्हा युवा सेनेचे नागपूर जिल्हा प्रमुख निलेश तिघरे यांनी राजीनामा दिला आहे. दुसरीकडे आज नामांकन अर्ज दाखल करणाऱ्या बंडखोरांवर लक्ष ठेवत या जागा वाढून मिळाव्यात यासाठी आज देखील भाजप आणि स्थानिक पातळीवर शिवसेना नेते, पदाधिकारी यांच्यात बैठकांचे सत्र सुरू राहणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उबाठात देखील सूत्र न ठरल्याने महाविकास आघाडीने अद्यापही जागावाटप किंवा उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. परस्परांच्या बंडखोरांवर प्रत्येकाची नजर आहे.
आज मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असल्याने यानंतरच खऱ्या अर्थाने राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू होती. मुंबईत जागा वाटप सूत्र ठरल्यानंतर नागपूरसह इतरत्र मनपासाठी जागावाटपावर या बैठकीत तोडगा काढण्यावर एकमत झाले. तोडगा न निघाल्यास दोन्ही पक्ष वेगळे लढतील असा निर्वाणीचा इशाराही दिला गेला. अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील चर्चेनंतर नागपूर भाजप शिवसेना एकत्रितपणे सामोरे जाण्याचे ठरल्याची माहिती आहे.