नागपूर : मुंबईत महायुतीचाच... महायुतीचाच... महायुतीचाच महापौर होणार, असे तीनवेळा निक्षून सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुन्हा एकदा महायुती अभेद्य असल्यावर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेतृत्व नवाब मालिक करीत असल्याने भाजपने थेट नाराजी व्यक्त केली आहे. याविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपची भूमिका योग्य असून, त्यावर पुन्हा बोलण्याची गरज नाही, असे सांगत आपला विरोधाचा सूर कायम ठेवला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, नागपुरातील हिवाळी अधिवेशनात भरपूर कामकाज होत आहे. खूप चर्चाही झाली. विधेयके संमत झाली आहेत. दरम्यान, मुले बेपत्ता होण्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पत्र आपण वाचलेले नाही. मात्र, अल्पवयीन मुलींसंदर्भात सांगायचे म्हणजे 90 टक्के मुली घरी परत येतात; परंतु यासंदर्भात पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारी या कायम असतात, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
अजित पवार यांची पाठराखण
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर्थिक सुधारणांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यांचा अनेकदा अर्थ चुकीचा निघतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवार यांची पाठराखण केली.
कल्याण-डोंबिवलीत भाजप, शिवसेना शिंदे गट प्रमुख पक्ष
कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिवसेना असे दोनच प्रमुख पक्ष आहेत. मात्र, अद्याप कुठलेही जागावाटप झाले नाही. फॉर्म्युला ठरलेला नाही. महायुतीचा विजय हाच आमचा फॉर्म्युला असल्याचे फडणवीस म्हणाले. मुंबईत कार्यकर्त्यांमध्ये लढण्याची मोठी स्पर्धा असली, तरी एकत्रितपणे लढताना कुठलीही नाराजी नाही, असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकावणे हे महत्त्वाचे आहे. विकासात्मक पारदर्शी सरकार आणणे हे महत्त्वाचे आहे. आदिवासी मुलींच्या लग्नासंदर्भात पालकांना धमकीप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचे एका प्रश्नाचे उत्तरात सांगितले.
मोदी सरकारमुळे सामन्यांच्या जीवनात सकारात्मक बदल
देशात मोदी सरकार अनेक सकारात्मक बदल करीत असून, त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात बदल होत आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘मनरेगा’तील बदलाविषयी प्रियांका गांधी यांनी व्यक्त केलेल्या टीकेला बेदखल केले.
वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नाला बगल
वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी विरोधाची भूमिका व्यक्त केली, याबाबत विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलण्यास नकार दिला. कुणाच्याही प्रतिक्रियांवर उत्तर देण्यास मुख्यमंत्री बांधील नाही, असे त्यांनी सांगितले.