Nagpur winter session 2025
नागपूर : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून (दि.८) नागपुरात सुरूवात झाली. पहिल्या दिवशी विधानसभेत विदर्भात होणारे अधिवेशन दीर्घ काळ चालावे, अशी मागणी विरोधकांनी केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आचारसंहितेमुळे कालावधी कमी झाला असला तरी पुढील वर्षी याची भरपाई केली जाईल, असा शब्द देत विरोधकांना शांत केले.
आज महत्वाचे म्हणजे पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. विधानपरिषदेचे देखील तासाभरात कामकाज तहकूब झाले. कामकाज लवकर संपल्याने आजचा पहिला दिवस खऱ्या अर्थाने सभागृहाबाहेर भेटीगाठींचा ठरला. कोकणातील नगरपालिका निवडणुकीत तापलेले राजकीय वातावरण पाहू जाता आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे निलेश राणे यांच्यातील हस्तांदोलन,झालेली भेट सभागृहाबाहेर चर्चेत आली.
राजकारण निवडणुकीपुरतेच करायचे असते. आता आमचे संबंध पूर्वीसारखे चांगले आहेत असेही रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे अनेक मान्यवरांनी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना त्यांच्या दालनात भेट घेत शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्यासह विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, मनिषा कायंदे, निरंजन डावखरे, किरण सरनाईक, तसेच काँग्रेसचे विधानपरिषद आमदार सतेज पाटील आणि अभिजीत वंजारी यांनी सभापती व उपसभापतींशी सौजन्यपूर्ण संवाद साधत हिवाळी अधिवेशनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या भेटींच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन फलदायी व विधायक ठरण्याची अपेक्षा आहे.