नागपूर : देवेंद्र फडणवीस नवीन चाल करुन दहशतवादाच्या व दोन खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटकेत असलेल्या व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वाझेला हाताशी धरुन माझ्यावर खोटे आरोप करीत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (दि. ३) केला आहे. काल जाहीर कार्यक्रमात फडणवीस-देशमुख एकत्रित व्यासपीठावर दिसले. मात्र त्यांनी परस्पर संवाद टाळला. आज देशमुख यांनी पुन्हा फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
आता या आरोपांना नागपुरात विविध कार्यक्रमासाठी असलेले फडणवीस कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे आहे. माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षापूर्वी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जेलमध्ये गेले पाहिजेत, यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप लावावे व तसे प्रतिज्ञापत्र करुन देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला होता. ही गोष्ट मी जनतेसमोर आणल्यामुळे ते वारंवार मला अडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. उच्च न्यायालयाने जामीन देताना सचिन वाझे याच्याबद्दल जे निरीक्षण नोंदविले आहे, त्याचा अभ्यास फडणवीस यांनी केलेला दिसत नाही. त्यांनी आधी त्याचा अभ्यास करुन आणि मग गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वाझेला आरोप करण्यास लावायला पाहिजे होते. मला जामीन देताना उच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर दोन खुनाचे आरोप आहेत. त्याच्या बयाणावर विश्वास ठेवता येणार नाही. मात्र वस्तूस्थिती अशी असतानाही फडणवीस त्याला हाताशी धरुन माझ्यावर खोटे आरोप करायला लावत असल्याचा देशमुख यांनी यावेळी पुनरुच्चार केला.