Local Body Elections Maharashtra
नागपूर: राज्यात प्रथमच एका पक्षाला तीन हजारावर नगरसेवक निवडून आणता आले. भाजप नंबर एकचा पक्ष असल्याचे सिद्ध पुन्हा एकदा सिद्ध झाले. नागपूर जिल्ह्यातील 27 पैकी 22 नगराध्यक्ष भाजपचे तर दोन मित्र पक्षांचे निवडून आले आहेत. कामठीत विधानसभा निवडणुकीचा वचपा काढला, प्रथमच मोठा विजय मिळाला. काटोल, मोहपा नगराध्यक्षपद थोडक्यात हुकल्याची खंत आहे. भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले ती सर्व शहरे मॉडेल म्हणून विकसित केली जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि.२२) दिली.
रामगिरी या शासकीय निवासस्थानी जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी मनपा, जि. प. निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याचे आदेश दिले. नगरसेवक तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हा अभूतपूर्व विजय आहे. राज्यात 75 टक्के महायुतीचे नगराध्यक्ष आले. महाविकास आघाडी 50 पुढे जाऊ शकली नाही. आपले 210 नगरसेवक आले. आघाडीचा पूर्णपणे सफाया झाला. भाजपचा स्ट्राईक रेट चांगला असल्याचा टोला लगावला. आपल्या सरकारवर जनतेने विश्वास दाखविला.
पंतप्रधान मोदींनी विश्वास आणि विकासाचे राजकारण केले ते लोकांना आवडले. 28 ठिकाणी बहुमत आपले असून पण नगराध्यक्ष नाहीत, अशी खंत व्यक्त केली. नागपूर जिल्ह्यात विरोधकांचे किल्ले उध्वस्त झाले. काटोलचा अपवाद राहिला. सावनेरला काँग्रेस मुक्त नप झाली. काही नेत्यांचे बालेकिल्ले आपल्या नेत्यांनी उध्वस्त केले त्या सर्वांचे अभिनंदन.
अभिनंदन कालपासून मी स्वीकारले पण खरे मानकरी तुम्ही आहात. आता जिल्ह्यातील सर्व 27 शहरे चकाचक होतील. आपली 22 मॉडेल शहरे करू, गुणात्मक परिवर्तन घडवू, जीप, महापालिकेतही हा विजय रथ सुरू राहील असा विश्वास आहे. मात्र कुठल्याही विजयाने आपण मातणार नाही, आपण लोकाभिमुख राहू असा विश्वास दिला.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी साडेसहा हजार कोटी दिले. 1250 कोटी रुपयांची डीपिसी, सर्वांच्या मेहनतीने हे चांगले दिवस आज पक्षाला आले आहेत. जिल्ह्यातील सर्व नेते, एकसंघ भाजप कामाला लागली. यामुळेच 317 नगरसेवक,22 नगराध्यक्ष निवडून आल्याचे सांगितले. आता मनपा,जीपच्या विजयाकडे जायचे आहे. जीप अध्यक्ष महायुतीचा होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी आमदार आशिष देशमुख,चरण ठाकूर, समीर मेघे, जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत मनोहर कुंभारे माजी जिल्हाध्यक्ष डॉ राजीव पोतदार प्रामुख्याने उपस्थित होते.