Nagpur Love Triangle Murder: नागपूरमध्ये प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादात एका 27 वर्षीय तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नरेंद्रनगर परिसरात गौरव पंकज रागडे याची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. मित्राची तरुणीशी जवळीक वाढल्यामुळे हा वाद सुरू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गौरव रामभाऊ राऊत आणि अभिषेक वासनिक या दोघांना अटक केली आहे. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला असून, पोलिसांकडून CCTV फुटेज आणि इतर पुराव्यांची तपासणी सुरू आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मृत गौरव रागडे याचे एका तरुणीसोबत सुमारे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, त्याचा मित्र गौरव राऊत हाही त्याच तरुणीच्या संपर्कात आला होता. राऊतने संबंधित तरुणीसोबत नरेंद्रनगरमध्ये क्लाउड किचन सुरू केल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. तो याच परिसरात भाड्याच्या घरात राहत होता.
गुरुवारी रागडे याला संबंधित तरुणीने राऊतसोबत पार्टी केल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. ही बाब त्याला खटकली आणि तो संतप्त झाला. त्यानंतर तो काही साथीदारांसह राऊतच्या घरी पोहोचल्याची माहिती आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रागडे आणि त्याच्यासोबतच्या व्यक्तींनी राऊतच्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून दरवाजा उघडण्यात आला नाही. त्यानंतर घरावर दगडफेक झाल्याचा आरोप आहे.
परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून राऊत आणि त्याचे साथीदार घराच्या मागील बाजूने बाहेर पडून तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, रागडे आणि त्याच्या साथीदारांनी त्यांचा पाठलाग केल्याचे पोलिसांनी सांगितले.
काही वेळानंतर नरेंद्रनगरमधील सुंदरवन नाल्याजवळ दोघेही समोरासमोर आले. आधी शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर परिस्थिती बिघडली. याच दरम्यान अभिषेक वासनिकही घटनास्थळी पोहोचल्याची माहिती आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मारामारी सुरू असताना राऊत आणि वासनिक यांनी रागडेच्या हातातील चाकू हिसकावून घेतला. त्यानंतर त्याच चाकूने रागडेवर वार करण्यात आल्याचा आरोप आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेला रागडे जमिनीवर कोसळला.
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेशी संबंधित व्हिडीओ समोर आल्याने प्रकरण अधिक चर्चेत आले आहे. जखमी अवस्थेत रागडे याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा करण्यात आले आणि आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी गौरव रामभाऊ राऊत आणि अभिषेक वासनिक या दोघांना अटक केली.
पोलिसांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. प्राथमिकदृष्ट्या हा वाद प्रेमसंबंध आणि संबंधित तरुणीच्या मुद्द्यावरून झाल्याचे सांगितले जात असले तरी, हत्येमागे जुने वैर किंवा अन्य काही कारण होते का, याचाही तपास केला जात आहे.
दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार मृत गौरव रागडे याच्याविरोधात यापूर्वीही हत्या, हत्येचा प्रयत्न आणि दरोड्यासह सुमारे नऊ गुन्हे आहेत. तो या घटनेच्या सुमारे दोन आठवडे आधीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींचाही पूर्वीच्या काही गुन्ह्यांशी संबंध असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून CCTV फुटेज, घटनेचा व्हिडीओ आणि इतर पुराव्यांच्या आधारे संपूर्ण घटनाक्रमाची पडताळणी केली जात आहे.