नागपूर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेने सर्व योजनांचे विक्रम मोडले असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. योजनेत खोडा घालणार्यांना जोडा द्या, आम्हाला तुम्ही आशीर्वाद दिल्यावर प्रसंगी ही रक्कम तीन हजारही होईल. हा दुसरा टप्पा संपल्यावरही नोंदणी सुरूच राहील, अशी ग्वाही देतानाच आर्थिक सक्षमतेसोबतच सुरक्षित बहीण योजनावर भर देऊ. अत्याचारप्रसंगी दोषींना फाशीची शिक्षा देऊ. चुकीला, गुन्हेगारांना माफी नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. काँग्रेसने कितीही विरोध केला तरी ही योजना बंद होऊ देणार नाही. तुमचा देवाभाऊ तुमच्या पाठीशी असल्याचा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. (Ladki Bahin Yojana)
रेशीमबाग मैदानावर शनिवारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या दुसर्या टप्प्याच्या लाभ वितरण कार्यक्रमात प्रचंड गर्दीत झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची ही योजना रक्षाबंधनाच्या निमित्ताने तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्याने त्याचे चांगलेच परिणाम दिसतील, बहिणी नक्कीच भाऊबीज देतील, असा विश्वास केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. सरकार या योजनेसाठी 75 हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करत आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांना आश्वस्त केले. (Ladki Bahin Yojana)