न्या. चांदीवाल अहवाल जनतेपुढे सार्वजनिक कऱण्याची मागणी अनिल देशमुखांनी केली आहे.  Pudhari News Network
नागपूर

Anil Deshmukh | न्या. चांदीवाल अहवाल सार्वजनिक करा, अन्यथा...! : अनिल देशमुखांचा इशारा

अहवाल दोन वर्षे सरकारकडे पडून

पुढारी वृत्तसेवा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : आपल्याला क्लीन चिट दिलेला १४०० पानांचा न्या. चांदीवाल अहवाल दोन वर्षे सरकारकडे पडून आहे. राज्य शासनाने हा अहवाल लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेपुढे सार्वजनिक करावा, अन्यथा मला पुन्हा न्यायालयात जावे लागेल, असा इशारा राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी आज ( दि. १८) पत्रकार परिषदेत दिला.

न्यायमूर्ती चांदीवाल यांनी चौकशी अहवाल सरकारला सादर केला

यासंदर्भातील एक स्मरणपत्र त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे. यापूर्वी २७ फेब्रुवारी व ७ जुलै २०२४ रोजी पत्र पाठविल्याचे सांगितले. देशमुख म्हणाले, मी २०२१ ला गृहमंत्री असताना माझ्यावर तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी काही आरोप केले होते. या संदर्भात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना माजी न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांच्या माध्यमातून चौकशी केली. अकरा महिन्याच्या चौकशीनंतर न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपला १४०० पानांचा चौकशी अहवाल सरकारला दोन वर्षापूर्वी सादर केला होता.

मिंधे सरकार जाणीवपूर्वक अहवाल जनतेसमोर आणत नाही

हा अहवाल विधानसभेत पटलावर ठेवावा, अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनेक पत्र देऊन केली होती. या दरम्यान शासनाला अहवाल सादर होताच अनेक वृत्तपत्राने अनिल देशमुख यांना क्लिन चिट देण्यात आल्याच्या बातम्या छापून आल्या. याविषयीची वृत्तपत्राची कात्रणेही त्यांनी यावेळी दाखविली. या अहवालात मला क्लीन चिट दिली म्हणून तर हा अहवाल शासन पटलावर ठेवून सार्वजनिक करण्यासाठी विलंब करीत आहे का ?, असा सवाल उपस्थित केला. मिंधे सरकार हा अहवाल जाणीवपूर्वक जनतेसमोर आणत नाही, असा आरोप देशमुख यांनी केला. सरकारने हा अहवाल लवकरात लवकर जाहीर केला नाही. तर मला नाईलाजाने न्यायालयात जावे लागेल, असा इशारा देशमुख यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT