Jhund Actor Murder
नागपूर: 'झुंड' (Jhund) या बहुचर्चित हिंदी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेला अभिनेता बाबू छत्री उर्फ प्रियांशु याच्या हत्येचे गूढ उकलले आहे. 'बाबू छत्रीने आपल्याला २४ तासांत संपवण्याची (गेम करण्याची) धमकी दिली होती. याच धमकीमुळे आपण त्याचा काटा काढला,' अशी कबुली आरोपी ध्रुव उर्फ दृप शाहू (वय २०, रा. नारा) याने पोलिसांना दिली आहे.
जरीपटका पोलिसांनी नुकतेच आरोपी ध्रुवला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ध्रुव शाहू हा स्वतः कुख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीच पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. मृत बाबू छत्री उर्फ प्रियांशु देखील परिसरात कुख्यात होता. या दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार वादविवाद आणि तणाव सुरू होता. या वादातूनच बाबू छत्रीने आरोपी ध्रुवला 'तुला २४ तासांत ठार मारणार' अशी थेट धमकी दिली होती. या धमकीमुळे ध्रुव प्रचंड धास्तावला होता. बाबू छत्रीकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीने त्याने स्वतःच बाबूचा गेम करण्याची संधी साधली, असे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे. बाबू छत्रीच्या हत्येमागे सूड आणि जीवे मारण्याच्या धमकीतून निर्माण झालेली भीती हेच मुख्य कारण असल्याचे आरोपीच्या कबुलीजबाबातून समोर आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.