

नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'झुंड' या चित्रपटात अभिनय करणारा प्रियांशु क्षत्रिय याची नागपूरमध्ये हत्या झाली आहे. प्रियांशुने ‘झुंड’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. मिळालेल्या माहितीनुसार, परस्पर वादातून संशयित आरोपीने गळा चिरून प्रियांशु यांची क्रूरपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना नागपूरमधील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारा परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 7) मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास प्रियांशु क्षत्रिय हा वायरने बांधलेल्या अवस्थेत जखमी आढळला. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर, जरीपटका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर प्रियांशुला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
पोलीस तपासात असे समोर आले आहे की, प्रियांशु उर्फ बाबू क्षत्रिय याच्यावर यापूर्वीही काही इतर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल होते. प्रियांशुची बहीण शिल्पा क्षत्रियने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून ध्रुव शाहू नामक संशयित आरोपीला अटक केली आहे. प्राथमिक तपासात हत्येमागील कारण पूर्ववैमनस्य असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
प्रियांशु उर्फ बाबू क्षत्रियने अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'झुंड' (Jhund) या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांचे आणि गुन्हेगारी जगताशी त्याच्या परिचयाचे चित्रण करणारा होता. चित्रपटाची कथा अशी होती की, निवृत्त झालेले फुटबॉल प्रशिक्षक असलेले अमिताभ बच्चन एका झोपडपट्टीत जातात आणि तेथील मुलांना फुटबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहित करतात. सुरुवातीला त्यांना यासाठी स्वतःच्या खिशातून ५०० रुपये द्यावे लागतात. परंतु, त्यानंतर कथा पुढे सरकते आणि झोपडपट्टीतील भंगार वेचणाऱ्या या मुलांचे आयुष्य बदलू लागते. हळूहळू गुन्हेगारीच्या विळख्यात अडकलेली ही मुले फुटबॉलच्या प्रेमात पडतात.
या चित्रपटात प्रियांशुने एक उत्कृष्ट पात्र साकारले होते. बाबू नावाच्या या भूमिकेत प्रियांशुने आपली छाप सोडली आणि आपल्या संवादफेकीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र, नागपूरच्या गल्लीबोळात प्रियांशुचे एक वेगळे जीवन होते, ज्यात तो पूर्ववैमनस्याचा बळी ठरला. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.