नागपूर : दोन वर्षांपासून एआयडीच्यावतीने ‘अॅडव्हान्टेज विदर्भ’ चे यशस्वीरित्या आयोजने केले जाते. विदर्भाचा औद्योगिक विकास व्हावा, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. हा विकास विदर्भकेंद्रीत व्हावा यासाठी एआयडीने जिल्हा, तालुकास्तरावरील विविध औद्योगिक क्षेत्रातील चांगल्या उद्योजकांना या प्रवाहात जोडावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री व ‘अॅडव्हांटेज विदर्भ’ चे प्रणेते नितीन गडकरी यांनी केले.
असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) च्यावतीने फेब्रुवारी महिन्यात यशस्वीरित्या आयोजित केलेल्या ‘अॅडव्हांटेज विदर्भ – 2025 – खासदार औद्योगिक महोत्सव’ च्या अहवालाचे प्रकाशन एनरिको हाईट्स येथील सभागृहात नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी खासदार अजय संचेती, स्टेट बँकचे उपमहाप्रबंधक राजेश सौरभ, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, एमएसएमई विभागाचे संचालक राजेश शिरसाट, एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे, उपाध्यक्ष गिरधारी मंत्री, सचिव डॉ. विजय शर्मा, फ्ल्यूएड व्हेंचर्सचे संस्थापक अमित सिंगल, एआयडी स्टार्टअपचे संयोजक डॉ. शशीकांत चौधरी तसेच, एआयडीचे पदाधिकारी राजेश बागडी, प्रशांत उगेमुगे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवकल्पनांना तंत्रज्ञानाची जोड देऊन ग्रामीण भागापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करताना नितीन गडकरी यांनी भविष्यात नागपुरात येऊ घातलेल्या ग्लोबल स्कील डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ तयार करता येईल, असे सांगितले. त्याने रोजगार दुपटीने वाढेल व विदर्भाचा तितक्याच वेगाने विकास होईल, असे ते म्हणाले.
यावेळी ‘फॅमिली कॅप नागपूर’ या अभिनव उपक्रमाची घोषणा करण्यात आली. तसेच, ‘स्टार्टअप कॉनेक्ट’- 2025 या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. अॅडव्हांटेज विदर्भचे 4 ते 5 दिवसांचे आयोजन करावे, जेणेकरून नवउद्योजकांना त्यातून प्रेरणा मिळेल. याशिवाय, एआयडीने महिला विंग सुरू करावी व महिला उद्योजकांना मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सूचविले.