कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा सांगली आणि बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सातारा-कागल व कोल्हापूर- सांगली या मार्गाची हवाई पाहणी केली. यानंतर सायंकाळी ते कोल्हापूर विमानतळावरून नागपूरला रवाना झाले.
गडकरी आज बेळगाव आणि सांगली जिल्ह्यातील विविध कार्यक्रमासाठी नागपूरहून कोल्हापूर विमानतळावर आले होते. कोल्हापुरी विमानतळावरून हेलिकॉप्टरने ते निपाणी येथील कार्यक्रमासाठी तसेच निपाणी येथून विटा (जि. सांगली) येथील कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने गेले. सांगली जिल्ह्यातील कार्यक्रम आटोपल्यानंतर हेलिकॉप्टरने ते कोल्हापूर विमानतळावर आले. या प्रवासादरम्यान त्यांनी या मार्गाची पाहणी केली.
यानंतर कोल्हापूर विमानतळावर आल्यावर गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली. यावेळी उर्वरित कामे वेळेत पूर्ण करा. ती करताना त्याचा दर्जा घसरणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.