Inauguration of Command and Control Center
कमांड अँड कंट्रोल सेंटरचे लोकार्पण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. Pudhari Photo
नागपूर

नागपूर : अत्याधुनिक 'कमांड अँड कंट्रोल सेंटर'चे लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि नागपूर पोलिस यांच्या संयुक्त विद्यमानाने गुन्हेगारीला आळा बसावा या उद्देशाने सिव्हील लाईन्स येथे स्थापित ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ स्थापन करण्यात आले आहे. या सेंटरचा लोकार्पण समारंभ बुधवारी (दि.12) नागपूरात पार पडला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सेंचरचे लोकार्पण करण्यात आले.

या वेळी बोलताना मंत्री फडणवीस म्हणाले, कायद्यातील बदलांमुळे गृह विभागाला अत्यांधुनिक तंत्रज्ञानाची जोड आपण दिल्यामुळे सर्वसामान्यांना यापुढे न्यायासाठी अधिक काळ तिष्ठत बसावे लागणार नाही, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड व नागपूर पोलिस यांच्या संयुक्त विद्यमानाने गुन्हेगारीला आळा बसावा या उद्देशाने सिव्हील लाईन्स येथे स्थापित ‘कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या’ लोकार्पण समारंभात बुधवारी सायंकाळी ते बोलत होते.

नागपूर पोलिसांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापर

नागपूर महानगरात सुमारे 1200 कि.मी. अंतराच्या ऑप्टीक फायबर केबलच्या माध्यमातून जवळपास 5800 कॅमेऱ्यांचे इंटिग्रेशन या नव्या कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये करण्यात आले आहे. आता संपूर्ण महानगरात जागोजागी लावण्यात आलेले कॅमेरे व मॉल्स, शोरुम्स, रेल्वे स्टेशन, इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या जवळपास 2200 कॅमेऱ्यांचेही इंटिग्रेशन यात आहे. कोणत्याही स्थितीत गुन्हेगार आता सुटणे शक्य नाही. कोणत्याही एका कॅमेऱ्यात गुन्हेगार लक्षात येईल. त्याच्यावर आता निगराणी ठेवता येईल, असे स्पष्ट करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातील आधुनिकता लक्षात आणून दिली. चॅट जीपीटीच्या धर्तीवर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून गुन्हेगारांचा चेहरा व आवाजही या तंत्रज्ञानात ओळखणे सुलभ झाल्याचे त्यांनी सांगितले.

गुन्हांमधील 5 कोटी 50 लाख मुद्देमाल संबधितांना हस्तांतरित

या विशेष समारंभात नागपूर शहर पोलिसांकडून विविध गुन्हांमध्ये तपास करुन जप्त केलेल्या सुमारे 5 कोटी 51 लाख 81 हजार रुपयांच्या मुद्देमालाचे संबंधित व्यक्तींना न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून हस्तांतरण करण्यात आले. सन 2021 ते 2024 या कालावधीत विविध गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेला हा मुद्देमाल होता. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर, नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, सह पोलीस आयुक्त आश्वती दोरजे, अतिरिक्त पोलीस उपायुक्त सर्वश्री प्रमोद शेवाळे, संजय पाटील व मान्यवर उपस्थित होते.

तंत्रज्ञानामुळे गुन्हेगारीवर आळी बसणार

पोलीस विभागातील आपण केलेल्या अत्याधुनिकीकरणामुळे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रभावी वापरामुळे गुन्ह्यांवर आळा घालणे सोपे झाले आहे. मात्र हळूहळू वाढणाऱ्या सायबर क्राईमपासून स्वत:ला सुरक्षित जर ठेवायचे असेल तर नागरिकांनी कोणत्याही मोहाला, आर्थिक लालसेला बळी न पडता स्वत: अधिक सावधगिरी व सुरक्षितता बाळगणे तेवढेच महत्वाचे आहे, या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध केले. पैसे मिळविण्याचा कोणताही शॉर्टकट हा केव्हाही संकट ओढवू शकतो यावर भर दिला.यावेळी त्यांच्या हस्ते सिंबा ॲपचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी एव्हेरेस्ट वीर सहायक पोलीस निरिक्षक शिवाजी नन्नावरे यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक पोलीस आयुक्त डॉ रविंद्र कुमार सिंगल यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सह पोलीस आयुक्त आश्वती दोरजे यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन पोलीस निरीक्षक इसारकर यांनी केले.

SCROLL FOR NEXT