HSC paper leak file photo
नागपूर

HSC paper leak: बारावीचा फिजिक्स, केमिस्ट्रीनंतर आता गणिताचाही पेपर फुटला; तांत्रिक तपासात धक्कादायक खुलासा

नागपूरमधील बारावीच्या परीक्षेतील भौतिकशास्त्र (फिजिक्स) आणि रसायनशास्त्र (केमिस्ट्री) या विषयांचे पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता गणिताचाही पेपर फोडल्याचे तांत्रिक तपासात समोर आले आहे.

मोहन कारंडे

HSC paper leak

नागपूर : नागपूरमधील बारावीच्या परीक्षेतील भौतिकशास्त्र (फिजिक्स) आणि रसायनशास्त्र (केमिस्ट्री) या विषयांचे पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता गणिताचाही पेपर फोडल्याचे तांत्रिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलचा डिलीट केलेला डेटा रिकव्हर केला आहे. या डेटामधून गणिताचाही पेपर फोडल्याचे स्पष्ट झाले आहे.

खासगी शिक्षकाने फोडले बारावीचे पेपर

नागपूरच्या सेंट उर्सुला शाळेतील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये व्हॉटस्अॅपवर रसायनशास्त्राचा पेपर आला होता. परीक्षा सुरू असताना संबंधित विद्यार्थिनी वॉशरूमच्या निमित्ताने सतत बाहेर ये-जा करत होती. तिच्या संशयास्पद हालचालीमुळेच पेपरफुटीचा हा गंभीर प्रकार उघडकीस आला. मोबाईलवरील माहितीनुसार भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे पेपर परीक्षेपूर्वीच व्हॉटस्अॅपवर शेअर करण्यात आले होते. याप्रकरणी सदर पोलिसांनी संबंधित विद्यार्थिनीचा मोबाईल जप्त करून तपास सुरू केला होता.

२५ ऐवजी २४ प्रश्नपत्रिका अनेक केंद्रांवर पोहचल्या

दरम्यान, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब झाल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. २५ ऐवजी २४ प्रश्नपत्रिका अनेक केंद्रांवर पोहचल्याची पर्यवेक्षकांची तक्रार आहे. विज्ञान शाखेचेच फिजिक्स, केमेस्ट्री, गणित, बायोलॉजी पेपर संदर्भात ही बाब घडली आहे. याचा पेपरफुटीशी संबंध आहे का? याचा तपास सुरू आहे.

पर्यवेक्षकांनी केंद्रप्रमुखांना याबद्दल कळवले असून बोर्ड अधिकाऱ्यांकडे अहवाल तयार करून पाठवला आहे. बोर्डाकडून तपास सुरू झाल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. प्रेसमधून सीलबंद पाकिटे परीक्षेच्या दिवशी केंद्रावर पाठवली जातात, मग हा प्रकार कसा घडला, याबाबत तपासानंतरच उलगडा होणार आहे.

व्हॉटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून पेपर फोडले

खासगी शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षकाने व्हॉटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून हे पेपर फोडल्याची माहिती पुढे आली. या प्रकरणी कोचिंग क्लास शिक्षक निशिकांत मुन, एक्सलेंट कोचिंग क्लास संचालक मुस्तफा खान आणि जुनेद मोहम्मद यांना अटक केली आहे. मात्र, या पेपर फुटीचा मुख्य सूत्रधार अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पेपरफुटीच्या तपासासाठी पोलिसांनी एसआयटी स्थापन केली असून मुख्य सूत्रधार हाती लागल्यावरच अनेक प्रश्नांचा उलगडा होणार आहे.

राज्यभरात प्रकार घडल्याचा संशय

नागपूरमधील हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अशा प्रकारे राज्यातही व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून पेपर फोडण्याचा प्रकार घडला असल्याच्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT