Raju Boche arrested Nagpur
नागपूर : विदर्भातील अकोला येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या हत्या प्रकरणी नागपुरातील रविभवन परिसरात एका फरार आरोपीस अटक करण्यात आली आहे. अतिशय नाट्यमयरित्या अटक केलेले संशयिताचे राजू बोचे असे नाव आहे. तो माजी सभापती व काँग्रेसचाच पदाधिकारी आहे.
6 जानेवारी रोजी सुमारे साडे तीन महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्यातील मोहाळा गावात मशिदीमधून बाहेर आल्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी हिदायत पटेल यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
या हत्या प्रकरणी उबेद पटेल या मुख्य आरोपीला त्याचवेळी अटक झाली होती. मात्र, राजू बोचे हा आरोपी फरार होता. गुरुवारी तो जेवण करण्यासाठी रविभवन परिसरात आला असता अकोट येथीलच काही लोकांनी त्याला ओळखले. पकडून ठेवत सदर पोलिसांना माहिती दिली.
मात्र, यावेळी दोन्ही बाजूने हाणामारी झाली. अखेर पोलिसांनी ताब्यात घेत रात्री उशिरा अकोट ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. अकोल्यातील र्काँग्रेस पक्षाच्याच नेत्याच्या हत्या प्रकरणी काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्याला नागपुरातील रवीभवन परिसरात अटक झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला आहे.