नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूरचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारत आहेत. हा क्षण जसजसा जवळ येत आहे. तसतशी नागपुरातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्यांची देवा भाऊच्या चाहत्यांची लगबग वाढत आहे. 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी (Devendra Fadnavis Oath Ceremony) रामनगर येथील गोपाल बावनकुळे या त्यांच्या लाडक्या चहावाला देखील त्यांच्या ऑफिसकडून निमंत्रण आले आहे.
अर्थातच पश्चिम नागपुरातील या चहावाल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यापूर्वी पश्चिम नागपूरचे आमदार असलेले देवेंद्र फडणवीस सध्या दक्षिण पश्चिम नागपूरचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, एकदा मैत्री केली की ती निभावणार असा त्यांचा स्वभाव आहे. साडेतीन-चार वर्षांपूर्वी आपण हे दुकान सुरू केले. एकदा स्वतः देवा भाऊ चहा पिण्यासाठी आले. मुख्यमंत्री झाल्यावर देखील मी तुमच्याकडे चहा प्यायला येणारच, असे त्यांनी सांगितले आणि तो शब्द ते नक्की पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. (Devendra Fadnavis Oath Ceremony)
विशेष म्हणजे इतर देवी-देवतांसोबतच त्यांच्या दुकानात देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो त्यांनी लावला आहे. आपण जरी शपथविधी सोहळ्याला जाऊ किंवा जाणार नसलो तरी या निमित्ताने आपल्या चहा स्टॉलवर लोकांना मोफत चहा दिला जाईल, आनंद साजरा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.