

नागपूर : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीला जनतेने महाकौल दिला. येत्या पाच डिसेंबरला सरकार शपथ ग्रहण करणार आहे. दुसरीकडे हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासन जोरात कामाला लागले आहे. 16 ते 24 डिसेंबर दरम्यान अधिवेशन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी ई ऑफिसचा प्रयोग केला जात असल्याने पन्नास टक्केपेक्षा अधिक फायलींचा भार, मुंबई ते नागपूर प्रवास कमी होणार आहे. विधान भवन, रवी भवन, आमदार निवास, हैदराबाद हाऊस येथील आवश्यक सुविधांची कामे पूर्णत्वास आली असून 1000 पेक्षा अधिक गाड्या अधिवेशनासाठी लागणार आहेत त्याची व्यवस्था, जुळवाजुळव सुरू झाली आहे.
मंत्री, आमदार, कर्मचारी अशी 8000 जणांची निवास व्यवस्था केली जात आहे. देवगिरी, विजयगड तसेच मंत्र्यांसाठीचे रवीभवन व नागभवन, आमदार निवास येथील व्यवस्थेवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कटाक्षाने लक्ष आहे. यावेळी देखील दोन उपमुख्यमंत्री राहणार असल्याने देवगिरी आणि विजयगड बंगला सज्ज ठेवण्यात आला आहे. आता कॉमन मन म्हणून हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी बंगल्यात या अधिवेशनासाठी वास्तव्यास येणार का, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.