नागपूर : मोवाड येथील आर्थिक संकटाला कंटाळून सेवानिवृत्त शिक्षकासह एकाच कुटुंबातील चौघांनी ठेवीदारांच्या सततच्या तगाद्यामुळेच, बदनामीच्या भीतीपोटी स्वतः ला संपविल्याचे पुढे आले आहे. विजय मधुकर पचोरी (वय.६८) माला विजय पचोरी (वय.५५) गणेश विजय पचोरी (वय.३८) व दीपक विजय पचोरी (वय.३६) अशी या चौघांची नावे आहेत. पोलिसांना एका मृतकाच्या खिशात सुसाईड नोट मिळाली असून त्यावर सर्वांच्या सह्या देखील असल्याची माहिती आहे, घटनेची माहिती मिळताच मोवाड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी घराचे दार आतून बंद होते. पोलिसांनी दार उघडून आत प्रवेश केला असता, घरात चौघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत पहायला मिळाले. मात्र, तिघांचे हात मागे बांधलेले तर एकाचे हात मोकळे होते. पोलिसांनी सर्व मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला. यावेळी गणेश विजय पचोरीच्या खिश्यात एक सुसाईड नोट आढळून आली. जीवन संपवण्यापुर्वी सर्वांनी सहमतीने जीवन संपविण्यासाठी सह्या केलेल्या असाव्या असे बोलले जाते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश पचोरी हे मातृ सेवा इंडिया निधी पतसंस्थेचा संचालक होते. फेब्रुवारीमध्ये त्यांच्यावर फसवणूक संदर्भात एक गुन्हा दाखल असून त्यांना अटक सुद्धा झाली होती. ऑगस्ट महिन्यात गणेश पचोरी जामिनावर बाहेर आले. गणेश यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक असून सदर कुटुंब आर्थिक अडचणीत होते. गणेशकडे पत संस्थेत गुंतवणूक करणाऱ्यांनी पैशासाठी तगादा लावला. आधीच आर्थिक अडचणीत असलेले कुटुंब यामुळे अधिकच हवालदिल झाले. यातूनच या कुटुंबाने अखेर सामुहिकरित्या जीवन संपविण्याचा निर्णय घेतला असावा असे बोलले जाते.
तिघांचे हात मागे बांधले होते व एकाचे माकळे होते. यावरून कुणीही जिवंत राहू नये या उद्देशाने प्रथम तिघांचे हात मागे बांधून त्यांना फासावर लटकवण्यात आले, आणि नंतर एकाने स्वतः गळफास लावून घेतला असावा. असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी नरखेड पोलीस सखोल तपास करीत आहेत.