मराठा आरक्षणासाठी स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या तरूणाने जीवन संपवले
नायगाव : नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या तरूणाने मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे निराशेतून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना बुधवारी (दि. १८) रात्री घडली. अंकुश बाबुराव ढगे असे या तरूणाचे नाव आहे. मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी नायगाव तालुक्यात आतापर्यंत ९ तरुणांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.
अंकुश हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. सरकारच्या मराठा समाजा संदर्भातील उदासीन धोरणामुळे आणि मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे तो नेहमी तणावात राहत होता. बुधवारी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला त्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. तत्पूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. "आपली परिस्थिती खुप हलाखीची असून मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे नोकरी लागत नाही. मी स्वतः समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जीवन संपवत आहे," असे चिठ्ठीमध्ये लिहिले आहे.