डॉ. पंकज भोयर  Image Source X
नागपूर

Pankaj Bhoyar | जरांगेंच्या आरोपांची फॉरेन्सिक चौकशी सुरू; सत्य लवकरच समोर येणार : पंकज भोयर

५०० कोटींच्या आरोपांशी संबंधित ऑडिओ क्लिपची तपासणी; एसआयटी स्थापन करण्याच्या हालचाली

पुढारी वृत्तसेवा

Manoj Jarange Audio Clip Investigation

नागपूर : मनोज जरांगे यांनी ५०० कोटी रुपयांच्या आरोपांसंदर्भात समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपची पोलिसांकडून फॉरेन्सिक तपासणी सुरू करण्यात आली आहे. या तपासणीतून क्लिपची सत्यता स्पष्ट होईल आणि प्रकरणातील वस्तुस्थिती लवकरच समोर येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.

या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. संबंधित ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळून पाहण्याची मागणी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडूनही करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे दोन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण होऊ नये, यासाठी वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे भोयर यांनी सांगितले.

या प्रकरणाशी संबंधित आणखी काही ऑडिओ क्लिप असतील, तर त्या तपासासाठी उपलब्ध करून द्याव्यात. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नये किंवा कोणाचीही बदनामी होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही भोयर यांनी केले.

एसआयटी स्थापन करण्याच्या हालचाली

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची फॉरेन्सिक चौकशी करण्याची ग्वाही दिली आहे. हे प्रकरण नेमके आताच कसे समोर आले आणि त्यातून कोणाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सत्यता तपासातून स्पष्ट होईल, असे सांगितले.

या प्रकरणाच्या चौकशीची मागणी भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि मनोज जरांगे यांनीही केल्याची माहिती आहे. गुरुवारी शिवसेनेचे आमदार आणि प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याबाबत चर्चा झाली. एसआयटी स्थापन करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

आता ऑडिओ क्लिपच्या फॉरेन्सिक तपासणीतून काय निष्पन्न होते आणि एसआयटीच्या स्थापनेबाबत पुढे काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT