प्रतिकात्‍मक छायाचित्र.  AI-generated image
नागपूर

Nagpur Dahi Handi DJ FIR : छोटा ताजबाग चौकातील दहीहंडीला डीजेचा दणका; भाजप युवा मोर्चाच्या १३ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

१० वाजेपर्यंत परवानगी असतानाही साडेदहापर्यंत डीजे सुरू; दोनदा ध्वनिपातळी १०० डेसिबलच्या वर

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Dahi Handi DJ FIR

नागपूर,पुढारी वृत्तसेवा : नागपूर  येथील छोटा ताजबाग चौकात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या १३ कार्यकर्त्यांसह इतरांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कार्यक्रमासाठी रात्री १० वाजेपर्यंतच ध्वनिक्षेपक व डीजे वाजवण्याची परवानगी असताना सुमारे साडेदहा वाजेपर्यंत कर्णकर्कश आवाजात डीजे सुरू असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. विशेष म्हणजे, कार्यक्रमादरम्यान दोन वेळा ध्वनिपातळी १०० डेसिबलपेक्षा अधिक नोंदवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे पोलिसांना निर्देश

छोटा ताजबाग चौकात रविवारी सायंकाळी भाजप युवा मोर्चाच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवासाठी मोठ्या संख्येने नागरिक, विशेषतः तरुणांची गर्दी झाली होती. गर्दीच्या नियंत्रणासाठी आणि सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बीम आणि लेझर लाईटच्या वापरावर बंदी घातली होती. तसेच ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले होते.

आमदार मोहन मते यांचा हस्‍तक्षेपास विरोध केल्‍याचा पोलिसांचा दावा

छोटा ताजबाग चौकातील कार्यक्रमात मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिस अधिकाऱ्यांनी आयोजक आणि साउंड सिस्टीम ऑपरेटरला आवाज कमी करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, डीजेचा आवाज कमी करण्यात आला नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, यावेळी आमदार मोहन मते यांनी माईकवरून घोषणा करत पोलिस कर्मचाऱ्यांनी स्टेजजवळ येऊ नये किंवा डीजे सिस्टीममध्ये हस्तक्षेप करू नये, असे सांगितल्याचा आरोप आहे. तसेच डीजेचा आवाज कमी केला जाणार नसल्याचेही त्यांनी म्हटल्याचा पोलिसांचा दावा आहे.

दोन वेळा १०० डेसिबलपेक्षा अधिक आवाज

कार्यक्रमादरम्यान पोलिसांनी ध्वनिपातळीची तीन वेळा तपासणी केली. त्यापैकी दोन वेळा आवाजाची पातळी १०० डेसिबलपेक्षा अधिक असल्याचे नोंदवण्यात आले. ध्वनिक्षेपकासाठी रात्री १० वाजेपर्यंत परवानगी असतानाही डीजे सुमारे साडेदहा वाजेपर्यंत सुरू राहिल्याचे पोलिसांनी सांगितले. डीजे बंद करण्यास सांगितल्यानंतर आयोजकांनी पोलिस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्याचाही आरोप आहे.

पोलिसांकडून गुन्‍हा दाखल

पोलीस उपनिरीक्षक सचिन फुंडे यांच्या तक्रारीवरून कार्यक्रमाच्या दोन दिवसांनंतर, मंगळवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), महाराष्ट्र पोलीस कायदा आणि पर्यावरण संरक्षण कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात भाजप युवा मोर्चाचे कुलदीप मते, अर्पित मालघाटे, केतन सातवणे, अक्षय खरबडे, उदय धोमणे, राजेश काळे, विजय ठाकूर, अंकुश भुरे, आर्यन पालंदूरकर, सूरज बानसोड, चेतन राठोड आणि अनिकेत साबळे यांच्यासह इतरांचा समावेश आहे.दहीहंडी आणि सार्वजनिक उत्सवांमध्ये ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलिसांनी यंदा कडक भूमिका घेतली आहे. छोटा ताजबाग चौकातील या कारवाईमुळे उत्सवांदरम्यान ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी आणि राजकीय आयोजकांवरील पोलिस कारवाईचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT