नागपूर, पुढारी वृत्तसेवा : बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाची व्याप्ती वाढत असून माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयातील अधीक्षक निलेश मेश्राम यानेच ही बोगस कागदपत्रे तयार करून दिली. सदर पोलिसांनी निलेश मेश्रामसह आणखी तिघांना अटक केली असून आता अटकेतील आरोपींची संख्या पाच झाली आहे. शिक्षण उपनिरीक्षक संजय शंकरराव सुधाकर (वय 53) , लिपिक असलेला सुरज पुंजाराम नाईक (वय 40) अशी इतर दोघांची नावे आहेत. (Nagpur Education Scam)
शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि मुख्याध्यापक पराग पुडके या दोघांना यापूर्वीच गडचिरोली येथून अटक करण्यात आली. दोघांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली गेली. चौकशीत नीलेश मेश्राम याने बनावट नियुक्ती पत्रासाठी पराग पुडके यांच्याकडून 10 लाख रुपये घेतल्याचे पुढे आले आणि पोलिस इतरही आरोपीपर्यंत पोहोचले. शिक्षण विभागातील इतरही अधिकाऱ्यांचे आता या कारवाईनंतर धाबे दणाणले आहेत.
बनावट व बोगस कागदपत्रांच्या आधारे एक सामान्य व्यक्ती एका अनुदानित शाळेचा मुख्याध्यापक झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षकांची आपापसातील चर्चा एका पेंटरने ऐकली आणि त्याने तक्रार, पाठपुरावा करून या मुख्याध्यापकाचे ‘पितळ' उघडे पाडले. मुख्याध्यापक बनण्यासाठी त्याने शाळा, जि.प., शिक्षण विभाग, शिक्षणाधिकारी, अधीक्षक, वेतन निश्चिती अधिकारी अशा अनेकाना सोबत घेतले. याप्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तडकाफडकी शिक्षण उपसंचालकाला अटक केली.
मुन्ना तुलाराम वाघमारे (वय ३८, रा. पहाडी, पालांदूर, लाखनी, भंडारा) हे पेंटिंगचे काम करत. सन २०१० पासून ते भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील जेवताळा येथील नानाजी पुडके विद्यालयाचे रंगरंगोटीचे काम करतात. एके दिवशी वाघमारे हे काही खाजगी कामानिमित्त जेवताळा येथील केंद्रीय शासकीय शाळेत गेले. दरम्यान, तेथील शिक्षक कर्मचारी आपापसात मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके (३४, रा. जेवताळा, ता. लाखनी, जि. भंडारा) याला शिक्षकपदाचा अनुभव नसताना, शिक्षक म्हणून कोठेही काम केले नसताना सरळ शाळेचा मुख्याध्यापक केले आणि गैरमार्गाने शासनाचा पगार घेऊन शासनाची फसवणूक करीत असल्याची चर्चा कानावर पडली.
वाघमारे यांनी या गोष्टीची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर पराग नानाजी पुडके याने नागपूर येथील एस.के.बी. उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर, यादव नगर, नागपूर या शाळेचे बोगस व बनावट कागदपत्रे तयार केली. त्या आधारावर शिक्षण विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड (५२) तसेच जिल्हा परिषद व शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचाºयांना हाताशी धरले. गैरमार्गाने मोठ्याप्रमाणात आर्थिक व्यवहार करून बनावट व बोगस कागदपत्रे तयार केली. तसेच चुकीच्या पद्धतीने नानाजी पुडके विद्यालय येथे मुख्याध्यापक पदावर रुजू झाल्याचे उघडकीस आले.
या प्रकरणांमध्ये शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, शिक्षणाधिकारी, अधीक्षक, वेतन निश्चिती अधिकारी तसेच इतर अधिकाºयांनी पैसे घेऊन पराग नानाजी पुडके यांच्या नावाने बनावट व बोगस प्रस्ताव तयार केला तसेच शिक्षक व मुख्याध्यापक पदाला मान्यता देऊन शालार्थ आयडी तयार केला. गैरमार्गाने शिक्षण विभाग, भंडारा येथील वरिष्ठ अधिकाºयांनी संगनमताने कट रचून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी शासनाची तसेच जनतेची फसवणूक केली.
१ ऑगस्ट २०१७ ते २१ जुलै २०२३ दरम्यान पराग नानाजी पुडके याने मुख्याध्यापक पदाची खुर्ची दाबून ठेवली. याप्रकरणी मुन्ना तुलाराम वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून, माहितीवरून व सादर केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केल्यानंतर आरोपी पराग नानाजी पुडके आणि शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून नरड यांना अटक केली आहे.