

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
नागपूर मार्गे हावडा कोलकत्ताकडे जाणाऱ्या 36 रेल्वे गाड्या 14 दिवसांसाठी रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विमान भाडे देखील दुप्पट तिप्पट झाल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत.
रायगड झारसगुडा रेल्वे मार्गावर चौथ्या रेल्वे लाईनच्या कामामुळे 11 ते 23 एप्रिल दरम्यान एकंदर 36 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. चार गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्यामुळे गोंदिया झारसगुडा, गोंदिया मेमू पॅसेंजर स्पेशल अशा तीन गाड्या बिलासपूर, रायगड मध्येच थांबवाव्या लागल्या.
रेल्वे प्रशासनाने या गाड्या रद्द केल्याची माहिती आधीच आरक्षण केलेल्या प्रवाशांना एसएमएसद्वारे दिली. मात्र अचानक रद्द झालेल्या या गाड्यांमुळे प्रवाशांचे नियोजन खोळंबले. रद्द झालेल्या गाड्यांमध्ये गीतांजली एक्सप्रेस, आजाद हिंद एक्सप्रेस, ज्ञानेश्वरी एक्सप्रेस, संत्रागाची- पुणे एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे. इतर गाड्यांमध्ये सध्या तिकीट उपलब्ध नसल्याने रेल्वे प्रवासी विमानाचा पर्याय स्वीकारत असताना विमान कंपन्यांनी एरवी नागपूर कोलकत्ता विमानाचे भाडे जे सात ते आठ हजार रुपये होते ते आता वीस हजारापर्यंत नेल्याने दोन्ही बाजूने प्रवाशांची कोंडी सुरू आहे.