Devendra Fadnavis on Rahul Gandhi
नागपूर : निवडणूक आयोगाने आकडेवारीसह सर्व प्रमाण दिले. रोज खोटे बोलण्याची सवय राहुल गांधी यांना लागलेली आहे. राहुल गांधी खोटे बोलून स्वतःच्या मनाला समजावतात. जोपर्यंत हे सत्य स्वीकारून जागे होऊन जमिनीवर ते काम करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलेही भवितव्य राहिलेले नाही. स्वतः खोटे बोलून स्वतःला दिलासा देण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. आमच्या लाडक्या बहिणीचा अपमान राहुल गांधी करत आहेत. जनतेने त्यांना योग्य उत्तर दिलेले आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी स्पष्ट केले.
स्थानिक कार्यक्रमांच्या निमित्ताने आले असता ते माध्यमांशी बोलत होते.राहुल गांधी यांनी बिहारमध्ये निवडणुकीपूर्वीच एकप्रकारे हार मानलेली आहे. राहुल गांधी जोवर जमिनीवर उतरणार नाही. स्वतः आत्मचिंतन करीत जोवर खोटे बोलणे सोडणार नाही, खोटी आश्वासने आणि दिलासा देणे सोडणार नाही तोपर्यंत त्यांचा पक्ष कधीही निवडणुकीत जिंकणार नाही. त्यांना जागे व्हावे लागेल, समजून घ्यावे लागेल असा सबुरीचा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
आज निवडणूक प्रक्रियेबाबत ते बोलले, अशाच पद्धतीने ते नेहमी खोटे बोलत असतात. देशातील मतदारांचा अपमान करत असतात.राहुल गांधी यांनी खरेतर विधानसभा निकालावर चुकीचे बोलून महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान केला आहे.
राहुल गांधी जे बोलतात ते त्यांनाही माहित नसते. ऐकणाऱ्याना ते समजत नाही त्यावर मी काय प्रतिक्रिया देणार असा चिमटा काढला. राहुल गांधी यांनी लिहिलेल्या लेख संदर्भात बोलताना ते म्हणाले, रोज खोटं बोललं की लोकांना खरं वाटते असेच राहुल गांधींना वाटत आहे. त्यामुळे त्याच त्या गोष्टी सातत्याने बोलत असतात. यापूर्वीही त्यांनी असा आरोप केलेला आहे. मात्र,निवडणूक आयोगाने सर्वकाही स्पष्टता केली आहे.
दरम्यान, पाणी परिषदेच्या माध्यमातून पाणी समस्येवर चर्चा होणार आहेत. वेगवेगळ्या स्पर्धा या माध्यमातून होत आहेत. त्यातून ज्या काही चांगल्या गोष्टी बाहेर येतील शासन देखील सहकार्य करण्यास तत्पर असेल. विद्यापीठ उत्तम उपक्रम राबवत आहे. त्याचा मोठा फायदा होणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.