Nagpur Municipal Corporation Elections
नागपूर : नागपूर महापालिका निवडणुकीत भाजप रेकॉर्डब्रेक यश मिळवेल. मुंबईत देखील महायुतीचा भगवा फडकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.१३) व्यक्त केला. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी दुपारी भारत माता चौक येथून सुरू झालेल्या रोड शोचा महाल गांधीगेट परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शो चा समारोप झाला. स्वतः फडणवीस बाईक चालवित सहभागी झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्सवाचे वातावरण होते. ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. या निमित्ताने ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, एक अति भव्य अशा प्रकारचा रोड शो आज आपण केला. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तो पाहता मला आता कुठलीच शंका नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप मागचा रेकॉर्ड तोडल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी भाजपा सेना महायुतीचा भगवा फडकेल आणि नागपूरकरांनो चिंता करू नका, मुंबईत देखील महायुतीचाच महापौर होणार, भगवा फडकणार आहे.
महाराष्ट्रात सगळीकडे या निवडणुकीमध्ये विकासाच्या, कामाच्या बळावर आपला मोठा विजय होणार आहे. आमचे काम तुम्ही पाहिलेले आहे. परिवर्तन तुम्ही पाहिले आहे आणि समोरचे कोण आहेत, ते फक्त बोल बच्चन आहेत. त्यांनी कधीही विकास केलेला नाही, असा निशाणा विरोधकांवर साधला. सामान्य माणसाचे जीवन बदलण्याकरता महायुतीच हवी. प्रत्येक युवकाला शिक्षण, आरोग्य आणि रोजगार त्याच्यापर्यंत पोहोचवण्याकरता पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार आहे.
15 जानेवारीला वोटिंगला जा, मतदान केंद्रात गेल्यानंतर इकडे तिकडे, काळा, गोरा असा विचार करू नका, केवळ काय बघायचं, कमळ आणि धनुष्यबाण...! केवळ कमळ आणि जिथे धनुष्यबाण तिथे धनुष्यबाण बटण दाबा, पाच वर्षाकरिता विकासाची जबाबदारी आमच्यावर सोडून द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी समारोप निमित्ताने केले. यावेळी महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, आशिष देशमुख, शिवसेना आमदार कृपाल तुमाने आणि इतर नेते, पदाधिकारी उपस्थित होते.