Youth Congress President Threat Sitabuldi Police Complaint
नागपूर: युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल नितीन राऊत (वय 35, रा. स्वामी समर्थ अपार्टमेंट, सिव्हिल लाईन्स) यांना १० लाख रुपयांची खंडणी मागून ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी काँग्रेसचे मुंबई पनवेल येथील कार्यकर्ते प्रशांत गायकवाड यांच्याविरुद्ध खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुणाल राऊत यांनी 15 ते 19 मार्च दरम्यान पुणे ते मुंबई अशी युवा आक्रोश यात्रा काढली. यात प्रशांत गायकवाड देखील सहभागी होता. समारोप कार्यक्रमात काही युवकांना आणण्याचे मला पैसे द्या, अशी मागणी त्यांनी कुणाल राऊत यांच्याकडे केली. पैसे न दिल्यास सोशल मीडियावर बदनामीची धमकी दिली.
दरम्यान, कुणाल हे दिल्ली व मुंबई येथे असल्याने 26 एप्रिल रोजी प्रशांत त्याचा साथीदार त्यांच्या सिविल लाईन येथील घरी आले. यावेळी कुणाल यांचे मेहुणे अभिषेक घरी होते. यावेळी प्रशांतने अभिषेक यांच्याशी वाद घातला. कुणाल यांनी दहा लाख रुपये दिले नाहीतर त्यांचे राजकीय करिअर खराब करेन, अशी धमकी दिली. नागपुरात आल्यानंतर कुणाल राऊत त्यांनी सीताबर्डी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
यापूर्वी प्रशांत गायकवाड यांनी कुणाल राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला पैसे न देता जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप माध्यमातून केला. याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे निवेदनातून केली होती एकंदरीत गेले अनेक दिवस विविध कारणांनी चर्चेत असलेल्या युवक काँग्रेसमधील वाद विवाद संपता संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.