E20 Ethanol Nitin Gadkari Pudhari
नागपूर

E20 Ethanol FIR: नितीन गडकरी आणि इथेनॉल संदर्भात दिशाभूल केल्याचा आरोप; चार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरविरोधात गुन्हा दाखल

E20 Ethanol FIR: इथेनॉल आणि E20 इंधनाबाबत दिशाभूल करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी नागपूर सायबर पोलिसांनी चार इन्फ्लुएन्सरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

E20 Ethanol FIR: इथेनॉल आणि E20 इंधनाबाबत दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याचा आरोप करत नागपूर सायबर पोलिसांनी चार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचा चुकीचा संदर्भ वापरून जनतेमध्ये गैरसमज पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, मनिष कश्यप (बिहार), देसी बॉयसर, हर्षित राठी आणि अंकलेश इन्वाटे या चार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरविरोधात कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांनी यूट्यूब आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इथेनॉल आणि E20 इंधनाबाबत दिशाभूल करणारे व्हिडिओ अपलोड केल्याचा आरोप आहे.

तसेच, या व्हिडिओंमधून केवळ चुकीची माहितीच प्रसारित करण्यात आली नाही, तर काही बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या इथेनॉल धोरणाचा चुकीचा संदर्भ वापरून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात नितीन गडकरी यांचा कोणताही थेट संबंध नसून, त्यांच्या नावाचा आणि धोरणाचा केवळ संदर्भ वापरण्यात आल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ही कारवाई भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सोशल मीडिया सेलने केलेल्या तक्रारीनंतर करण्यात आली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर नागपूर सायबर पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवला.

दरम्यान, नागपूर सायबर पोलिसांनी संबंधित व्हिडिओंची तांत्रिक तपासणी सुरू केली असून, त्यामधील मजकूर, दावे आणि त्याचा जनतेवर झालेला परिणाम याचीही पडताळणी केली जात आहे. तपासादरम्यान आणखी काही तथ्य समोर येण्याची शक्यता असून, या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे. इथेनॉल आणि E20 इंधनाबाबत सोशल मीडियावर अनेक दावे आणि प्रतिदावे व्हायरल होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT