Dr Manali Kshirsagar Nagpur University VC
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून डॉ. मनाली मकरंद क्षीरसागर यांनी बुधवारी (दि.३) आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शिकविणारे अभ्यासक्रम सुरू करीत विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
डॉ. मनाली क्षीरसागर यांनी कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांच्याकडून कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी कुलसचिव डॉ. राजू हिवसे उपस्थित होते. पदभार स्वीकारण्यापूर्वी विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याला त्यांनी माल्यार्पण, अभिवादन केले.
हिवाळी परीक्षा तीन शिफ्टमध्ये तंत्रज्ञान आधारित नवनवीन अभ्यासक्रम सुरू करणे काळाची गरज आहे. उद्योगांना अपेक्षित असलेले कुशल मनुष्यबळ मिळावे यासाठी उद्योग आधारित अभ्यासक्रम तयार करीत विद्यार्थ्यांना रोजगार करणार असल्याचे डॉ. क्षीरसागर यांनी पुढे बोलताना सांगितले. हिवाळी परीक्षा तीन शिफ्टमध्ये आयोजित करीत वेळेवर निकाल लावण्याबाबत आढावा घेतला जाणार आहे.
हिवाळी परीक्षेतील वेळापत्रक तातडीने प्रकाशित केले जातील. उन्हाळी परीक्षा नियमित वेळेवर होतील, असा विश्वास कुलगुरूंनी व्यक्त केला. विद्यापीठातील प्रशासन प्रणाली समजून घेत आवश्यक त्या ठिकाणी सुधारणा केली जाणार आहे. त्याच पद्धतीने संलग्नित महाविद्यालयांमध्ये सुधार केला जाणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.
इतरत्र देशातील विद्यार्थी विद्यापीठात शिक्षण घेण्याकरिता यावेत या दृष्टीने एनआयआरएफ रँकिंगमध्ये सुधार करीत क्यूएस रँकिंग करिता आवेदन केले जाणार आहे. उत्कृष्ट संशोधनाकडे अधिकाधिक लक्ष दिले जाणार आहे. जगातील मनुष्यबळाची मागणी असलेल्या देशाला अपेक्षित असणारे कौशल्य आपल्या विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. या माध्यमातून जगाची कुशल मनुष्यबळाची मागणी पूर्ण होईल, तसेच विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी मिळतील, असा विश्वास कुलगुरूंनी व्यक्त केला.