राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे थाटात उद्घाटन Pudhari Photo
नागपूर

Devendra Fadanvis| आदिवासींच्या जल, जंगल, जमीनीसह संस्कृतीचे रक्षण करुः मुख्यमंत्री

राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे थाटात उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

नागपूर- राज्य शासन प्रत्येक आदिवासींना वन जमीन पट्टा देत आहे व त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करीत आहे. जनजाती वर्षाच्या निमित्ताने राज्य शासन भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आदिवासींच्या जल, जंगल आणि जमीन व संस्कृतीचे रक्षण करेल, असा विश्वास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

आदिवासी विकास विभागाच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त व जनजातीय गौरव वर्षांतर्गत येथील मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी फडणवीस बोलत होते. महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके, विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव राजेश कुमार, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्धाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आदिवासी जननायकांचे चरित्र जनतेसमोर आणण्याचे तसेच त्यांचे स्मारके उभारण्याचा कार्यक्रम दिला आहे. राज्य शासनानेही राज्यातील आदिवासी नायकांचा गौरवशाली इतिहास पुस्तक रूपाने जनतेसमोर आणला आहे. विविध योजनांद्वारे आदिवासी समाजाचा विकास साधण्यात येत आहे. राज्यातील आदिवासी आश्रम शाळांचा दर्जा सुधारला आहे. आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी स्वयम् योजना राबविण्यात येत आहे. एकही आदिवासी मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. राणी दुर्गावती सक्षमीकरण योजनेद्वारे दीड लाख आदिवासी महिलांना पन्नास हजार ते दीड लाखांपर्यंत मदत करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात आदिवासी समाजाच्या विकासासाठी धरती आबा कार्यक्रम देशभर राबविण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात धरती आबा कार्यक्रम राबविण्यासाठी 17 मंत्रालयांच्या 25 योजना एकत्र करून 32 जिल्ह्यातील 5 हजार गावांतील प्रत्येक आदिवासी पाड्यांवर रस्ते, पाणी, वीज, रोजगार आणि महिला विकासाच्या योजना पोचविल्या जात आहेत. आश्रमशाळांचे डिजिटायजेशन झाले आहे. 37 एकलव्य शाळांतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. प्रत्येक आदिवासींना वन जमीन पट्टे देण्यात येत आहे.

देशाच्या विकासात आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. भगवान बिरसा मुंडा हे या समाजाच्या अभिमान व स्वाभिमानाचे प्रतिक आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहून आपली समृद्ध परंपरा जपण्याचे कार्य हा समाज करीत असून त्यांच्या सर्वांगिक विकासाठी संकल्प करण्याचे आवाहन यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यापासून भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाच्या वतीने भगवान बिरसा सांस्कृतिक मंचाची स्थापना केली. याद्वारे 40 हजार युवा-युवतींची नोंदणी व विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. राणी दुर्गावती योजनेच्या माध्यमातून आदिवासी महिला लखपती दीदी होत असल्याचेही सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजन व लोकार्पण

सुराबर्डी, नागपूर येथील गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय तथा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण उपकेंद्राचे भूमिपूजन, शासकीय आश्रमशाळा, घानवळ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार, जि. पालघर येथील इमारतीचे लोकार्पण, शासकीय आश्रमशाळा पळसुंडा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार, जि. पालघर येथील प्रयोगशाळा इमारतीचे लोकार्पण. शासकीय आश्रमशाळा, देवगाव, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक येथील संकुलात मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे यावेळी करण्यात आले. विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT