मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रतीकात्मक दहीहंडी फोडून उत्सवाची सुरुवात झाली.  Pudhari
नागपूर

Dahi Handi Nagpur | डीजेला फाटा: भजनाच्या तालावर रंगला दहीहंडीचा थरार; नरेंद्रनगरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतीकात्मक दहीहंडी फोडून उत्सवाला सुरुवात

सात थरांचा मानवी मनोरा रचत जय शितला माता मंडळाने फोडली हंडी

पुढारी वृत्तसेवा

Devendra Fadnavis Nagpur Dahi Handi Celebration

नागपूर : जन्माष्टमी मित्रपरिवार, सुंदरबन श्रीनगर आणि परिसरातील नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने नरेंद्रनगर चौकात आयोजित भव्य दहीहंडी उत्सव भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रतीकात्मक दहीहंडी फोडून उत्सवाची सुरुवात झाली. यावेळी भंडारा येथील जय शितला माता मंडळाने सात थरांचा मानवी मनोरा रचत दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला. मंडळाला ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

प्रभाग क्रमांक ३५ च्या नगरसेविका विशाखा मोहोड यांच्या विशेष प्रयत्नातून या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जन्माष्टमी मित्रपरिवार, श्रीनगर सुयोगनगर आणि सुंदरबन नागरिक कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कौटुंबिक उत्सवात भारतीय संस्कृती, भक्ती आणि परंपरांना विशेष प्राधान्य देण्यात आले.

भजन-भक्तिगीतांनी उत्सवात रंग भरला

उत्सवाची सुरुवात सामूहिक हनुमान चालीसा पठणाने करण्यात आली. त्यानंतर गंगा महाआरती पार पडली. डीजे संस्कृतीला फाटा देत भजन आणि भक्तिगीतांच्या तालावर दहीहंडीचा उत्साह साजरा करण्यात आला. युवकांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘भजन रॉक बँड’ हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला.

अश्लील गाणी व नृत्याला थारा न देता आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सात थरांचा मानवी मनोरा रचत जय शितला माता मंडळाने दहीहंडी फोडताच उपस्थितांनी जल्लोष केला.

“डीजे नाही, अश्लीलता नाही; भक्ती, संस्कृती आणि युवकांचा जोश” या संकल्पनेतून आयोजित या दहीहंडी उत्सवाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार सुधाकर कोहळे, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT