नागपूर : आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एकच शल्य आहे, "अरे कुठं नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र?" असा सवाल काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
नरसापूर मध्ये बलात्कार पीडित बालिकेच्या वडिलांना कॉलर खेचली जाते. न्याय मागणाऱ्या महिलांवर लाठीचार्ज केला जातो व्वा रे महायुती सरकार...बलात्कारीपेक्षा न्याय मागणाऱ्या सामान्य नागरिकांचा त्रास होतोय का तुम्हाला? त्यांना पोलिसी खाक्या दाखवण्यात मर्दुमकी वाटते का? मुख्यमंत्री देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना 3-4 वर्षांची बालिका! नरसापूरच्या लेकीला न्याय मिळावा यासाठी आंदोलन करणाऱ्या माता-भगिनींवर लाठीचार्ज केला जातोय, काल अशीच अमानवी मारहाण नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा केली. पाशवी बहुमत मिळाले आहे म्हणून हुकूमशाही पद्धतीने हे सरकार सामान्य जनतेला तुडवत आहे.
या आरोपीने आधीही दोन महिलांवर अत्याचार केले, तुरुंगाची शिक्षा मिळाली तरी हा आरोपी मोकाट बाहेर फिरतोय आणि आज पुन्हा एक लेक बळी पडली. अशी व्यवस्था असेल तर मुलींना, महिलांना सुरक्षित कसे वाटेल? आणि वरून सरकारच पीडितांविरोधात पोलीस बळाचा वापर करत असेल तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची? लहान मुलींवर अत्याचार वाढत आहे , पोलिसांवरील विश्वास कमी होत आहे म्हणूनच लोकांना रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची वेळ आली आहे! पण त्यांच्या वेदना समजून न घेता त्यांनाच मारता? हा कोणता न्याय देवाभाऊ?? असाही सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.