'या' लोकांना अभय देण्यासाठीच हे सत्तेत बसलेत का ? ; वडेट्टीवार

Nagpur News | महाराष्ट्रात महायुतीचे सरकार असताना विलीनीकरणाच्या मागणीवर भाजपचा घसा का सुकला?
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarPudhari
Published on
Updated on

नागपूर : राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देण्यासाठी सत्तेत बसले आहे काय? या शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री विरोधात काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रहार केला.

ज्याला महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही, ज्याची अक्कल कवडीची आहे, अशा भोंदू माणसाने महाराजांवर भाष्य करण्याची हिंमत कशी केली? छत्रपती शिवाजी महाराज कोणापुढे झुकले असते तर स्वराज्य निर्माण झाले नसते. सत्तेत बसलेले लोक या बाबांच्या पायाशी लोळण घेतात, म्हणूनच या भोंदूंची मस्ती वाढली आहे आणि ते महाराजांचा अपमान करतात. या भोंदूने महाराजांचा अपमान केला तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी का थांबवले नाही? नंतर बोलून उपयोग नाही. मनुवादी भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताना बघत राहिली, पण बालिश भोंदूकडून महाराजांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही असा इशारा दिला.

संजय गायकवाड सारखे शिवप्रेमी आता कोणत्या बिळात लपून बसले आहेत? आता का बोलत नाही, शिव्या देत नाही. महाविकास आघाडी सत्तेत असताना गोपीचंद पडळकर, सदावर्ते यांना हाताशी धरून एसटी कर्मचाऱ्यांचा संप करण्यात आला होता. जे महायुती सरकारला जमले नाही तेलंगणा सरकारने ते करून दाखवले आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार असताना विलीनीकरणाच्या मागणीवर भाजपचा घसा का सुकला?

एसटी ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आहे. विरोधी पक्षात असताना एसटीच्या विलीनीकरणासाठी जे ओरडत होते, ते आता सत्तेत आल्यावर मूग गिळून गप्प का आहेत? तेलंगणा सरकारने एसटीचे विलीनीकरण केले, एसटी कर्मचाऱ्यांच्या ३१ मागण्या मान्य केल्या. त्यांच्या कामाच्या वेळा कमी केल्या, पगारवाढ दिली, नोकरीत नियमितीकरण केले. तर महाराष्ट्रात हे का होऊ शकत नाही? सत्तेची उब मिळाल्यावर भाजपला एसटी कामगारांच्या संघर्षाचा विसर पडला आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर प्रश्न विचारला असताना वडेट्टीवार म्हणाले की अशी भेट झाली की नाही हे ते दोन्ही नेते सांगू शकतात.पण मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त जवळीक वाढल्याच्या चर्चा आहेत. याबाबत अधिक भाष्य करणे उचित नाही.

चंद्रपूरला येणार काँग्रेसची सत्ता

दरम्यान, चंद्रपूरच्या राजकारणावर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले की, आमच्या काही चुकांमुळे सत्ता गेली असेल,पण आता चित्र बदलले आहे. महापालिकेत फक्त २४ नगरसेवक सोडले तर ४२ नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. महापौर उतरवण्याची तयारी पूर्ण झाली असून, लवकरच चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता दिसेल. भाजपचा बालेकिल्ला ढासळायला वेळ लागणार नाही असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news