नागपूर शहरात घडलेली एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा सायबर गुन्हेगारांच्या वाढत्या उचापतींचे गंभीर चित्र उघड करते. दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या तपासाशी तुमचं नाव जोडून, तुम्ही मनी लॉंडरिंगमध्ये सहभागी असल्याचा बनाव करीत एका 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 29 लाख 30 हजार रुपयांनी लुटण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या रकमेतून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक झाल्याने केवळ कुटुंबच नाही तर पोलिस यंत्रणेतदेखील खळबळ उडाली आहे.
घटनेची सुरुवात 11 नोव्हेंबर रोजी झाली. अचानक या ज्येष्ठ नागरिकाच्या व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला. समोरचा व्यक्ती स्वतःची ओळख “मी मुंबई पोलीस मुख्यालयातून PSI सुमित मिश्रा बोलतोय” अशी करीत अत्यंत अधिकारी भाषेत धमकी देऊ लागला. दिल्लीतील स्फोटात मनी लाँड्रिंगचे मोठे प्रकरण सुरू असून या प्रकरणात तुमचे नाव समोर आल्याचा त्याचा दावा होता. तपासात सहकार्य केले नाही तर तुम्हाला लगेच अटक केली जाईल अशी भीती दाखवण्यात आली.
या धक्क्यातून नागरिक सावरत नाही तोच दुसऱ्याच क्षणी दुसरा कॉल आला. या वेळेस कॉल करणाऱ्याने स्वतःला “लखनऊ ATS अधिकारी” म्हणवत पुन्हा अटकेची धमकी देत त्याच कथेला पुष्टी दिली. दोन वेगवेगळे कॉल्स, त्यातही दोघांनीही सारखे आरोप repeat केल्याने वृद्ध पूर्णपणे घाबरला.
अटकेची भीती, सरकारी अधिकाऱ्याचा अधिकारशाही सूर आणि दिल्ली स्फोटासारख्या गंभीर प्रकरणात नाव आल्याचा धक्का या सर्वांनी हा ज्येष्ठ नागरिक मानसिकदृष्ट्या कोसळला. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी आपली मुदत ठेव मोडून जमा असलेले 29 लाख 30 हजार रुपये गुन्हेगारांनी सांगितलेल्या खात्यांवर पाठवले. पैसे पाठवल्यानंतर कॉल करणाऱ्यांनी संपर्क तोडला आणि वृद्धाला काहीतरी चुकल्याची शंका यायला लागली.
घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी मुलाला सर्व प्रकार सांगितला. मुलाने तत्काळ लक्षात आणून दिले की ही थेट फसवणूक आहे. त्यानंतर सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आयटी कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे. गुन्हेगारांनी वापरलेल्या फोन नंबरची, व्यवहार केलेल्या बँक खात्यांची आणि पैशांचा प्रवास कुठे झाला याची तपासणी सुरू आहे.
देशभरात वरिष्ठ नागरिकांना लक्ष्य करून "अटक होईल", "NIA तपास", “ATS केस” किंवा “आपले आधार–PAN वापरून गुन्हा झाला आहे” अशा धमक्यांद्वारे पैसे उकळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. दिल्लीतील बॉम्बस्फोटासारखे संवेदनशील प्रकरण वापरल्याने या फसवणुकीला आणखी भीषण रूप मिळते.
पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की कोणताही सरकारी अधिकारी कधीही फोनवरून पैशांची मागणी करत नाही, तसेच तपासाच्या नावाखाली पैसे हस्तांतरित करण्यास सांगत नाही. नागपूर सायबर पोलिस आता या रॅकेटमागील टोळी शोधण्यासाठी तपास वेगाने करत आहेत.